भुमराळा येथील बीजोत्पादन करणारे कष्टकरी शेतकरी संतोष डिगांबर भोसले यांच्यावर रात्रीतच काळाचं सावट कोसळलं आहे.

भुमराळा तालुका लोणार सरोवर
भुमराळा येथील बीजोत्पादन करणारे कष्टकरी शेतकरी संतोष डिगांबर भोसले यांच्यावर रात्रीतच काळाचं सावट कोसळलं आहे.
लोणार तालुका प्रतिनिधी ,ज्ञानेश्वर माऊली मोरे
दिनांक ८ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला करून शेतातील कलश कंपनीचा मिरचीचा सीड प्लॉट निर्दयपणे कापून टाकला.
या अमानुष कृत्यात तब्बल १२ गुंठे क्षेत्रावरील ६०० झाडे उध्वस्त झाली असून अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याच्या वेदना
शेतकरी संतोष भोसले यांनी स्वतःच्या घरापेक्षा, मुलापेक्षा, कुटुंबापेक्षा जास्त जिव लावून हा प्लॉट उभा केला होता.
दिवस-रात्र मेहनत, रोजंदारीवर २५ महिलांना घेऊन पोलिनेशनचे काम सुरू होतं.
कर्ज, परतफेड, रोजचे जगणे – या सगळ्या तणावातून शेतकरी कष्ट करून बीजोत्पादनाचा प्लॉट फुलवत होता.
पण एका रात्रीत कुणीतरी पोटसुळाने पेटून, निर्दयपणे त्याच्या घामाचे, भविष्यासाठीच्या स्वप्नांचे चिरफाड करून टाकले.
1. एका शेतकऱ्याचे पोट पिळवटून टाकणारे हे षड्यंत्र कोणाचं आहे?
2. शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?
3. बीजोत्पादन करून देशाच्या अन्नधान्याची वीण बांधणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाला एवढं स्वस्त समजलं जातं का?
4, शेतकऱ्याच्या आयुष्यावर असा डोंगर कोसळला असताना प्रशासनाच्या हालचाली एवढ्या संथ का?
5. शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कडक शिक्षा कधी मिळणार?
हा प्रकार फक्त संतोष भोसले यांच्यावरचा अन्याय नाही, तर प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याच्या आत्म्यावर वार आहे.
शेतकऱ्याचं भविष्य, त्याची मुलांची स्वप्नं, त्याच्या घामाची किंमत – सगळं एका रात्रीत उद्ध्वस्त केलं गेलं.
ही घटना जर गांभीर्याने घेतली नाही, तर उद्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात असा विनाश घडवून आणणाऱ्यांचे हात आणखी बळकट होतील.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्याला न्याय द्यावा व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच शेतकरी समाजाची मागणी आहे.




