प्रशासनाचा अन्याय सहन न झाल्याने शेतकरी थेट ३०० फुट टॉवरवर

मशागतीवर बंदी म्हणजे शेतकऱ्याच्या गळ्याला फास!
प्रशासनाचा अन्याय सहन न झाल्याने शेतकरी थेट ३०० फुट टॉवरवर
बुलडाणा (७ सप्टेंबर)
हक्काची शेती असतानाही मशागत करण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथील शेतकरी राजू काकडे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील बीएसएनएलच्या ३०० फुट टॉवरवर चढून आक्रोश आंदोलन केले. रविवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल पाच तास रंगले, तर परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी जमली.
काकडे यांच्या बहुतांश जमिनीचे अधिग्रहण शासनाने केले असून, सध्या फक्त पाऊण एकर शेती शिल्लक आहे. या जमिनीतूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असताना महसूल विभागाने “तांत्रिक कारण” सांगत मशागत रोखली. हा अन्याय सहन न झाल्याने संतप्त शेतकरी थेट टॉवरवर चढले आणि प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला.
प्रशासन, पोलिस व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास आंदोलक शेतकरी खाली उतरले. या वेळी नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, तहसीलदार पाटील, पोलिस निरीक्षक रवी राठोड, तसेच अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. अॅड. रोठे यांनी पुढील कायदेशीर पाठपुराव्याची जबाबदारी स्वतः उचलल्याने आंदोलक शेतकऱ्याने आंदोलन तूर्तास स्थगित केले.





