सिंदखेडराजा नगराध्यक्ष पदासाठी दिलीप चौधरी आणि योगेश म्हस्के यांची नावे चर्चेत

सिंदखेडराजा नगराध्यक्ष पदासाठी दिलीप चौधरी आणि योगेश म्हस्के यांची नावे चर्चेत
सिंदखेड राजा, विशेष प्रतिनिधी
सिंदखेडराजा | आगामी नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची बैठक आज सिंदखेडराजा येथे संपन्न झाली. या बैठकीचे नेतृत्व शिवसेना तालुकाध्यक्ष आत्माराम शेळके आणि शहराध्यक्ष उल्हास भुसारे यांनी केले.
बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी दिलीप चौधरी आणि नगरसेवक योगेश म्हस्के ही दोन नावे पुढे आली. नगरसेवक योगेश म्हस्के यांनी बैठकीदरम्यान सर्वानुमते दिलीप चौधरी यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी सुचवले. तसेच, चौधरी यांनी नकार दिल्यास नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतः लढविण्याची तयारी असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीने जर नगराध्यक्ष पदासाठी जागा सोडली नाही, तर आम्ही मशाल चिन्हावर मैत्रीपूर्ण लढा देऊ, असा इशारा योगेश म्हस्के यांनी दिला.
बैठकीत पक्षाची भूमिका, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि आगामी निवडणुकांची तयारी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि शिवसेनेच्या विचारधारेनुसार जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार केला.
शहरातील सर्व विभागांमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला आत्माराम शेळके, उल्हास भुसारे, नगरसेवक योगेश म्हस्के, दिलीप चौधरी, रंजीत मरमट, शेख शहजाद, रशीद भाई, सुनील साबळे, युनूस भाई, गोकुळ मेहेत्रे, एम.के. जाधव, श्रीराम कुहीरे, ज्ञानेश्वर साबळे, माधव मेहेत्रे, विलास मेहेर, विशाल व्यवहारे, प्रकाश जाधव, गजानन जाधव, प्रल्हाद सोळुंके, राजू चौधरी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




