महाराष्ट्रमहिलायवतमाळयुवालोकल न्यूज़शाळे कॉलेज

“बाप नावाचा सूर्य जोपर्यंत डोक्यावर असतो, तोपर्यंत दुःखाचा स्पर्शही होत नाही” प्रा. निरंजन राठोड

फुलसावंगी येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

“बाप नावाचा सूर्य जोपर्यंत डोक्यावर असतो, तोपर्यंत दुःखाचा स्पर्शही होत नाही” प्रा. निरंजन राठोड

फुलसावंगी येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

    फुलसावंगी | यवतमाळ प्रतिनिधी : विक्की भिसे

आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या युगात तरुण पिढी भरकटत चालली असून, योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज निर्माण झाली आहे. शिक्षण, संस्कार आणि कुटुंबीयांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी फुलसावंगी येथे आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात भावनिक व प्रेरणादायी विचार मांडण्यात आले.

“आजची तरुण पिढी ज्या वयात आपले ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे शिक्षण घ्यायला हवे, त्या वयात विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. मुलांनो, तुम्हाला या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी तुमच्या वडिलांनी किती काबाडकष्ट उपसले आहेत याचा विचार करा. तुम्हाला नवे बूट-चप्पल घेऊन देणारा बाप स्वतः मात्र उन्हात, चिखलात, काट्यात अनवाणी फिरतो. आई स्वतःच्या लुगड्याला गाठी पडल्या तरी तुमच्या कपड्यांची व्यवस्था करते. म्हणूनच तुमच्या यशामुळे समाजात तुमच्या बापाची मान अभिमानाने उंचावली पाहिजे,” असे भावनिक आवाहन विद्यार्थी मार्गदर्शक प्रा. निरंजन राठोड यांनी केले.

ते फुलसावंगी येथील स्व. सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की,

“बाप नावाचा सूर्य जोपर्यंत डोक्यावर असतो, तोपर्यंत दुःखाचा स्पर्शही होत नाही. त्यांच्या हयातीतच बापाला तुमच्या यशाच्या आनंदात रडू द्या, हेच तुमचे खरे यश असेल.”

त्यांच्या या विचारांनी संपूर्ण सभागृह भावूक झाले.

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते व बेधुंदकार गोविंद पोलाड यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.

“आज आपण सिनेमातील अभिनेत्यांना आपले आयडॉल मानतो, म्हणून अभिनेते निर्माण होत आहेत. मात्र समाज घडवायचा असेल आणि देशाला योग्य दिशा द्यायची असेल, तर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांना आपला प्रेरणास्रोत बनवावे. तेव्हाच भविष्यात नवे महापुरुष घडतील,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागावचे तहसीलदार अभय मस्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून

पोलीस निरीक्षक धनराज निळे, कुणाल नाईक, प्रा. निरंजन राठोड, आबेद शेख, प्रा. सुधीर भाटे, प्रा. विनोद राठोड, प्रा. संदीप चंद्रवंशी, शमशेर खान लाला, गजानन वाघमारे, डॉ. अब्दुल्लाह कुंदन, गजानन साबळे, नंदू कावळे, अमोल राजवाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक व नैतिक मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. ही गरज ओळखून फुलसावंगी पत्रकार संघ दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. आतापर्यंत या मंचावर राज्यातील अनेक नामवंत विद्यार्थी मार्गदर्शक व प्रबोधनकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

यंदाही सालाबादप्रमाणे आयोजित या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बेधुंदकार गोविंद पोलाड व प्रा. निरंजन राठोड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची जाणीव करून दिली.

यावेळी पत्रकार संघाचे सदस्य विवेक पांढरे, डॉ. गजानन वैद्ये, विवेक शेळके, करम खान, संजय जाधव, ज्ञानेश्वर सोमेवार, शेख रिजवान, सचिन छन्नीकर, अजय पाचंगे, विक्की भिसे, चंद्रकांत पंडागळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसलीम शेख यांनी केले, प्रास्ताविक शैलेश वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, पत्रकार संघ व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!