फळबाग मस्टरपासून वंचित शेतकऱ्यांचा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

फळबाग मस्टरपासून वंचित शेतकऱ्यांचा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
तालुक्यातील ग्राम गोगरी, हिरंगी, खेर्डा बु. व खेर्डा खुर्द येथील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मागील चार महिन्यांपासून राष्ट्रीय कृषी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग मस्टरचा लाभ मिळालेला नाही. या गंभीर प्रकाराबाबत समस्त फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी, वाशीम यांना लेखी निवेदन देत तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कृषी सहाय्यकांकडून गावातील जबाबदारी असूनही प्रत्यक्ष गावात येऊन कामकाज केले जात नाही. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, गावातील सुमारे १५ फळबाग उत्पादक शेतकरी मागील चार महिन्यांपासून रोजगार हमी योजनेअंतर्गत मस्टर काढण्यापासून वंचित राहिले असून, शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही.
यापूर्वी कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यकांच्या कालावधीत शेतकऱ्यांना नियमितपणे शासकीय योजनांचा लाभ मिळत होता. मात्र सद्यस्थितीत संबंधित कृषी सहाय्यकांच्या दुर्लक्षामुळे फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कृषी सहाय्यकांना योग्य सूचना देत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित मस्टर तात्काळ काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच आठ दिवसांच्या आत न्याय न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ऋषीकेश भिकाजी पवार यांनी निवेदनातून दिला आहे.




