Uncategorized

मंगरुळपीर बस स्थानकातील ‘हिरकणी कक्ष’ अनेक महिन्यांपासून कुलूपबंद

महिलांच्या सुरक्षिततेसाठीची योजना ठरतेय केवळ दिखावा

मंगरुळपीर बस स्थानकातील ‘हिरकणी कक्ष’ अनेक महिन्यांपासून कुलूपबंद

महिलांच्या सुरक्षिततेसाठीची योजना ठरतेय केवळ दिखावा

            वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

मंगरुळपीर येथील एस.टी. महामंडळाच्या बस स्थानक परिसरात महिलांसाठी उभारण्यात आलेला ‘हिरकणी कक्ष’ गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णतः कुलूपबंद अवस्थेत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, विश्रांतीसाठी व मूलभूत सुविधांसाठी शासनाने सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात मात्र केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित कक्ष उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रवासादरम्यान महिला, गरोदर माता, लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला, वृद्ध महिला तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना बसची प्रतीक्षा करताना सुरक्षित, स्वच्छ व आरामदायी जागा मिळावी, हा ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यामागील मुख्य उद्देश होता. मात्र मंगरुळपीर बस स्थानकातील हा कक्ष कायमस्वरूपी बंद असल्याने महिलांना या सुविधेचा कोणताही लाभ मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

बस स्थानकात आधीच अपुरी बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत हिरकणी कक्ष बंद असल्याने महिलांना उन्हात, पावसात किंवा गर्दीमध्ये उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. विशेषतः गरोदर महिला, लहान मुलांसह आलेल्या माता व आजारी महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

महिलांच्या सुरक्षिततेबाबत शासन व प्रशासनाकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र देखभाल, कर्मचारी नियुक्ती व अंमलबजावणीचा अभाव दिसून येतो. हिरकणी कक्ष उभारण्यात आला असला तरी त्याची देखभाल, स्वच्छता, महिला कर्मचारी नियुक्ती आणि सुरक्षा याबाबत एस.टी. महामंडळाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा कक्ष केवळ नावापुरताच उरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

“महिलांसाठी सुविधा दाखवण्यासाठी योजना सुरू केल्या जातात, पण त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अशा योजना निष्प्रभ ठरतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी महिलांकडून व्यक्त होत आहे. अनेक महिलांनी या संदर्भात बस स्थानक प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.

हिरकणी कक्ष तातडीने सुरू करून तेथे महिला कर्मचारी नियुक्त करावेत, नियमित स्वच्छता राखावी, पिण्याचे पाणी, बसण्याची सुविधा व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कक्ष बंद ठेवण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी महिला प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे या हिरकणी कक्षाच्या भवितव्यावरून स्पष्ट होणार असल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!