मलकापूर पांग्रा येथे ‘शराब नही, दूध पियेंगे’ उपक्रमाला २५ वर्षांची गौरवशाली परंपरा
नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे दारू, जल्लोष आणि अपघातच असतात का, असा थेट सवाल मलकापूर पांग्रा गावाने गेल्या २५ वर्षांपासून समाजासमोर उभा केला आहे.

मलकापूर पांग्रा येथे ‘शराब नही, दूध पियेंगे’ उपक्रमाला २५ वर्षांची गौरवशाली परंपरा
सिंदखेड राजा, मलकापूर पांगरा पत्रकार भगवान साळवे
नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे दारू, जल्लोष आणि अपघातच असतात का, असा थेट सवाल मलकापूर पांग्रा गावाने गेल्या २५ वर्षांपासून समाजासमोर उभा केला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे “शराब नही, दूध पियेंगे” हा अभिनव आणि सामाजिक भान जपणारा उपक्रम गेल्या पाव शतकापासून सातत्याने राबवला जात असून, ३१ डिसेंबर २०२५ रोजीही या परंपरेला उजाळा देत तरुणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेत नवीन वर्षाचे स्वागत केले.
दारू, व्यसन, अपघात आणि आरोग्याच्या समस्या वाढू नयेत, या उद्देशाने तब्बल २५ वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या काळात थर्टी फर्स्ट म्हणजे दारू पिऊन जल्लोष करण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात होती. या प्रवाहाला छेद देत “मरीज नाही, सशक्त बनूया” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी दुधाचे वाटप करून नवीन वर्ष साजरे करण्याचा आदर्श पायंडा पाडला.
याच परंपरेनुसार ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पोलीस मदत केंद्रासमोर शेकडो तरुणांनी दूध प्राशन करून नवीन वर्षाचे स्वागत केले. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी अजित बांगर, ठाणेदार गजानन करेवाड, नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे, गटशिक्षणाधिकारी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वतः सहभाग घेतल्याने हा उपक्रम केवळ सामाजिक संदेश न राहता कृतीत उतरलेला आदर्श ठरला, असा सूर उपस्थितांमधून व्यक्त झाला.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते गुलशेर खासाब, शेख अकील ठेकेदार, सरपंचपती यादव टाले, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष मोहम्मद यारखा, डॉ. दिनकर सोनुने, प्रवीण देशमुख, सत्तार बाबा, लोकजागरचे प्रवीण गीते, वसंतराव उदावंत, डॉ. सुरेश डोडिया, तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक, शंकर उगलमुगले, अविनाश नागरे, बीट जमादार निवृत्ती पोफळे यांची उपस्थिती होती.
उमराहून पवित्र यात्रा करून आलेले सत्तार बाबा यांनी व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी येणाऱ्या काळात एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा करत या चळवळीला नवी ऊर्जा दिली. तर गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी युवकांना मार्गदर्शन करताना महापुरुषांचे व संतांचे विचार आत्मसात करा, शिक्षण घ्या आणि व्यसनापासून दूर रहा, असा मोलाचा सल्ला दिला. तसेच ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची घोषणा केली.
नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे यांनी “शराब नही, दूध पियेंगे” या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येक गावात असे अनेक उपक्रम राबवले गेले पाहिजेत, तेव्हाच व्यसनमुक्त समाज निर्माण होईल, असे मत व्यक्त केले. ठाणेदार गजानन करेवाड यांनी थर्टी फर्स्टला दारू पिऊन भरधाव वाहने चालवल्याने अपघात, हिट अँड रनसारख्या घटनांत अनेकांचे जीव जात असल्याचे सांगत युवकांनी दारूऐवजी दूध प्या आणि सशक्त बना, असे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी निकम यांनी युवकांनी वाचनाची नशा करा, महापुरुषांचा वारसा पुढे चालवा आणि व्यसनमुक्त जीवन स्वीकारा, असे आवाहन केले. लोकजागरचे प्रवीण गीते यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन आटोळे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार भगवान साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक यांनी केले. या उपक्रमाचे आयोजन पत्रकार भगवान साळवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हानिप बागवान, पत्रकार वसीम शेख, ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे, अमोल साळवे, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मगर व ज्ञानेश्वर कळकुंबे यांनी केले.
पोलीस प्रशासन, महसूल, शिक्षण आणि सामान्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नवीन वर्ष साजरे करताना दारू नव्हे तर दूध पिऊन व्यसनमुक्त आणि सशक्त समाज घडवण्याचा संकल्प घेणारा मलकापूर पांग्राचा हा उपक्रम आजही समाजाला दिशा देणारा ठरत आहे.

