ताडगुड्यात लाल झेंड्याला मानाचा सलाम जल–जंगल–जमिनीच्या लढ्याचा पुन्हा एक निर्धार
एटापल्ली तालुक्यातील ताडगुडा येथे भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या शंभराव्या वर्षानिमित्त साध्या पण विचारांनी भरलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ताडगुड्यात लाल झेंड्याला मानाचा सलाम जल–जंगल–जमिनीच्या लढ्याचा पुन्हा एक निर्धार
एटापल्ली | प्रतिनिधी – तेजेश गुज्जलवार
एटापल्ली तालुक्यातील ताडगुडा येथे भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या शंभराव्या वर्षानिमित्त साध्या पण विचारांनी भरलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ताडगुडा गाव पाटील कॉ. मनोज नरोटी यांच्या हस्ते लाल झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. लाल झेंड्याकडे पाहताना अनेक वर्षांचा संघर्ष, त्याग आणि लढ्याचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला.
हा कार्यक्रम कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव) यांच्या नियोजनातून पार पडला. कार्यक्रमाला भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, राज्य सहसचिव कॉ. श्याम काळे, छत्तीसगड राज्य सहसचिव कॉ. फुलसिंग कचलाम, राज्य परिषद सदस्य मंजू कोवासी, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. महेश कोपुलवार, गडचिरोली जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, जिल्हा सहसचिव कॉ. अॅड. जगदीश मेश्राम आदी नेत्यांची उपस्थिती होती.
तसेच शेकापचे सरचिटणीस भाई रामदास जराते, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक मा. सैनुजी गोट, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. ऋषी पोरतेत, आयटक जिल्हा सचिव कॉ. विनोद झोडगे, किसान सभेचे उपाध्यक्ष कॉ. रमेश कवडो, भाकप राज्य परिषद सदस्य कॉ. अनिल हेपट, यवतमाळ जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे, आदिवासी महासभेचे प्रतिनिधी कॉ. सत्तू हेडो व कॉ. संदीप गोटा उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी ताडगुडा तसेच एटापल्ली तालुक्यातील अनेक गावांतून शेतकरी, मजूर, युवक, महिला आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने जमले होते. कॉ. विलास नरोटी, कॉ. रामदास उसेंडी, विष्णू हिचामी, चैतू नरोटी, पंकज बाराई, अमित पालित, विशाल पुजलवार, राजेश मुजुमदार, कॉ. प्रकाश खोब्रागडे, कॉ. बाळू खोब्रागडे, नारायणपूर जिल्हा सचिव कॉ. चेईतराम, विद्यार्थी संघटनेचे कॉ. अथर्व निवडींग, कॉ. शुभम वनमवार, कॉ. गीता दासरवार, तालुका सहसचिव कॉ. रितेश जोई आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, जल, जंगल आणि जमीन ही कोणाच्या दयेवर नाही तर ती या भूमीवर जगणाऱ्या आदिवासी, शेतकरी व मजुरांची आहे. पेसा कायदा असो किंवा वनहक्क कायदा, हे कायदे सहज मिळाले नाहीत. केंद्रात UPA-१ सरकारच्या काळात कम्युनिस्ट डाव्या पक्षांच्या ६२ खासदारांनी ठाम भूमिका घेतल्यामुळेच हे हक्क कायद्यात रूपांतरित झाले, हे विसरता कामा नये.
एटापल्ली तालुक्यात भाकपने ग्रामसभा अधिकार, वनहक्क दावे, रोजगार, पाणी, रस्ते आणि आदिवासी प्रश्नांवर सातत्याने संघर्ष केला असून हा लढा पुढेही अधिक ताकदीने सुरू ठेवला जाईल, असेही वक्त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार सर्वांनी एकत्रितपणे केला.
लाल सलाम!
जल–जंगल–जमीन आमची आहे!
संघर्ष थांबणार नाही!




