छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राजे लखोजीराव जाधव उच्च प्राथमिक शाळेत सामूहिक मानवंदना
सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव उच्च प्राथमिक शाळा येथे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राजे लखोजीराव जाधव उच्च प्राथमिक शाळेत सामूहिक मानवंदना 
सिंदखेडराजा प्रतिनिधी रवी ढवळे
सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव उच्च प्राथमिक शाळा येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सामूहिक मानवंदना देत शिवरायांना अभिवादन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्वराज्याची संकल्पना आणि सर्वधर्मसमभाव याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग सांगून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिवरायांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवरील भाषणे, कविता व घोषवाक्यांच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसरात “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी देशभक्तीचा उत्साह संचारला होता. कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नर्सरीच्या मुख्याध्यापिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श नागरिकत्वाचे संस्कार रुजविण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी राष्ट्रगीताने समारोप केला.



