जय गजाननजयंतीधर्ममहाराजमहाराष्ट्रमहिलासांप्रदायिकसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

दुसरबीड येथे संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा भक्ती, श्रद्धा व अध्यात्मिक वातावरणात संपन्न

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील गजानन नगर शिक्षक कॉलनी परिसरात

दुसरबीड येथे संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा भक्ती, श्रद्धा व अध्यात्मिक वातावरणात संपन्न

  विशेष प्रतिनिधी : सिंदखेडराजा – गजानन सोनुने

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील गजानन नगर शिक्षक कॉलनी परिसरात असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात यंदाही संत गजानन महाराजांचा पावन प्रकट दिन सोहळा अत्यंत भक्तीभाव, श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

संत गजानन महाराजांच्या कृपाशिर्वादाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ पासून श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणास विधिवत प्रारंभ झाला. या पारायणामध्ये महिलांसाठी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत, तर पुरुष भक्तांसाठी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्वतंत्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते

. संपूर्ण आठवडाभर मंदिर परिसरात नामस्मरण, भजन व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. गावासह परिसरातील असंख्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पारायणात सहभाग नोंदविला.
रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची गर्दी दिसून येत होती. सकाळी श्रींचा अभिषेक व अभ्यंगस्नान विधी वैदिक मंत्रोच्चारात आणि भक्तीभावाने संपन्न झाला. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात, पावली व फुगडीच्या तालावर आणि “गण गण गणात बोते” या जयघोषात श्री गजानन महाराजांची भव्य व आकर्षक मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक श्री गजानन महाराज मंदिरापासून सुरू होऊन भगवान मंदिर, बसस्थानक मार्गे हनुमान मंदिर, घुगे गल्ली असा संपूर्ण गावाचा प्रदक्षिणा मार्ग पार करत पुन्हा मंदिरात पोहोचली. मिरवणुकीदरम्यान संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. महिला, पुरुष, युवक व बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सोहळ्याचे सौंदर्य अधिकच खुलविले.

यानंतर सकाळी ११ वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प. सिद्धनाथ प्रेमानंद महाराज यांच्या सुमधुर वाणीने संपन्न झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी बाळ श्रीकृष्ण भगवंतांच्या जीवनातील तत्त्वज्ञान, भक्तीचे महत्त्व, सदाचाराचे आचरण, तसेच संतांच्या संगतीने मानवाचे जीवन कसे पवित्र व मार्गदर्शित होते याविषयी अत्यंत प्रभावी व भावस्पर्शी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
या भक्तीमय व अध्यात्मिक प्रकट दिन सोहळ्याची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने रांग लावली होती. संपूर्ण कार्यक्रम शांतता, शिस्त आणि भक्तीभावात पार पडला.
अशा प्रकारे दुसरबीड येथील संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा भक्तांच्या मनात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करत, संतांच्या विचारांची प्रेरणा देत यशस्वीरित्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!