बुलढाणामहाराष्ट्रलोणारसरकारी योजनासामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजासोशल मीडियाहवे रोड

हिवाळी अधिवेशनातील पाठपुराव्याला यश :

केंद्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाच्या पाठबळामुळे जालना–वझर आघाव मार्गे लोणार ‘लालपरी’ अखेर धावली

हिवाळी अधिवेशनातील पाठपुराव्याला यश :केंद्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाच्या पाठबळामुळे जालना–वझर आघाव मार्गे लोणार ‘लालपरी’ अखेर धावली

        लोणार | प्रतिनिधी : रघुनाथ आघाव

ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला असून जालना ते लोणार ही एस. टी. बस सेवा वझर आघाव मार्गे सुरू करण्यात आली आहे. दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी बहुप्रतिक्षित ‘लालपरी’ रस्त्यावर धावल्याने लोणार तालुक्यातील विविध गावांमध्ये समाधान, आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू, भुमराळा, वझर आघाव, येवती, चिंचोली, सांगळे, देऊळगाव कुंडपाळ आदी गावांतील नागरिकांना उपचारासाठी, शासकीय कामकाजासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी जालना व छत्रपती संभाजी नगर येथे वारंवार प्रवास करावा लागतो. याच मार्गावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी जालना व छत्रपती संभाजी नगर येथे शालेय, महाविद्यालयीन व व्यावसायिक शिक्षणासाठी ये-जा करतात.

मात्र आतापर्यंत या सर्व प्रवाशांना लोणार–सुलतानपूर मार्गे जालना असा लांबचा, वेळखाऊ व खर्चिक प्रवास करावा लागत होता. बसची थेट सुविधा नसल्यामुळे अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. परिणामी आर्थिक नुकसान, वेळेचा अपव्यय तसेच रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

ही गंभीर समस्या लक्षात घेऊन लोणार तालुका शिवसेना संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव व वझर आघावचे सरपंच संतोष साळवे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. ग्रामसभा, निवेदने, प्रशासकीय कार्यालयांतील भेटी अशा माध्यमातून ही मागणी वारंवार मांडण्यात आली.

या मागणीला अधिक बळ देण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हिवाळी अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. यावेळी जालना–लोणार बस सेवा वझर आघाव मार्गे सुरू करण्याची सविस्तर माहिती, नागरिकांच्या अडचणी व संभाव्य प्रवासी संख्येचा मुद्देसूद आढावा मांडण्यात आला.

या मागणीला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी विशेष पाठबळ दिले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या अडचणी लक्षात घेऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना केल्याचे सांगण्यात आले. तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनीही या मागणीस ठाम पाठिंबा देत प्रशासनाकडे सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

केंद्रीय व राज्यस्तरीय लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळे तसेच स्थानिक पातळीवरील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर एस. टी. महामंडळाने या मागणीची दखल घेत जालना–लोणार बस फेरी दुसरबीडमार्गे जवळका, किनगाव जट्टू, भुमराळा, वझर आघाव मार्गे सुरू करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिली बस फेरी अधिकृतपणे सुरू करण्यात आली.

बस सुरू होताच मार्गावरील प्रत्येक गावात नागरिकांनी फुलांची उधळण, जल्लोष व आनंदोत्सव साजरा करत लालपरीचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एस. टी. महामंडळाचे अधिकारी, आगार प्रमुख तसेच या सेवेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

या बस फेरीमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना थेट, सुरक्षित, वेळेवर व परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे प्रवासाचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून विशेषतः विद्यार्थी, महिला, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात या मार्गावर बस फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

एकूणच अनेक वर्षांचा संघर्ष, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून ग्रामीण भागाला मिळालेली ही बस सेवा म्हणजे लोकहितासाठी केलेल्या प्रयत्नांचे मूर्त स्वरूप असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!