गौरव पुरस्कारबुलढाणामहाराष्ट्रविदर्भशाळे कॉलेजसिंदखेड राजासोशल मीडिया

जागदरीचे सुपुत्र गणेश उगलमुगले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण नाविन्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी

जागदरीचे सुपुत्र गणेश उगलमुगले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

       रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण नाविन्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी कार्याची राज्यस्तरावर दखल घेत बी द चेंज फाउंडेशन, कोपरगाव (अहिल्यानगर) यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मुळ सिंदखेडराजा तालुक्यातील जागदरी येथील सुपुत्र तथा सध्या जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक गणेश उगलमुगले यांना प्रदान करण्यात आला.

हा मानाचा सन्मान रविवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे पार पडलेल्या भव्य व शिस्तबद्ध समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार, आधुनिक व स्पर्धात्मक शिक्षण मिळावे, या ध्येयाने गणेश उगलमुगले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विविध अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. बदलत्या शैक्षणिक प्रवाहाशी सुसंगत राहून डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, स्मार्ट क्लासरूमची अंमलबजावणी, शैक्षणिक अ‍ॅप्स व ऑनलाइन साधनांचा अभ्यासक्रमाशी मेळ घालणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, चिकित्सक विचारशक्ती व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

विद्यार्थी हेच शिक्षण प्रक्रियेचे केंद्रबिंदू मानून अध्यापन करणे, प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, क्षमता व गरज ओळखून वैयक्तिक मार्गदर्शन देणे, मागास व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग घेणे, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथालय उपक्रम राबविणे, तसेच शाळा सजावट, स्वच्छता व पर्यावरण विषयक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणणे, ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवून विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शिर्डी येथे झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभास कर्नल सुनील राजदेव, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता पगार, अरुण भंडारे, श्रीराम थोरात यांच्यासह शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणांतून शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून भावी पिढी घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे प्रतिपादन केले. गणेश उगलमुगले यांचे कार्य हे राज्यातील इतर शिक्षकांसाठी आदर्श व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना गणेश उगलमुगले यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक यशाचा नसून माझ्या शाळेतील सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याचा सन्मान आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न पुढेही अखंडपणे सुरू राहतील.”

या राज्यस्तरीय सन्मानामुळे निवडुंगा गावासह जाफराबाद तालुका तसेच मूळ गाव जागदरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडुंगा ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, जाफराबाद तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी गणेश उगलमुगले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

या सन्मानामुळे संपूर्ण तालुक्यातील शिक्षक वर्गामध्ये नव्या उत्साहाने, जोमाने आणि नव्या संकल्पनांसह कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!