एक्सीडेंटक्राइमट्रॅक्टर अपघातबुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक कार्यकर्तेहवे रोडहॉस्पिटल

लोणावळा येथे मेहकरच्या प्रज्वलचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते, साहित्यिक व नाट्यकर्मी प्रा. वसंत गिरी यांचे एकुलते एक

लोणावळा येथे मेहकरच्या प्रज्वलचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

मेहकर | प्रतिनिधी : प्रा. दिलीप नाईकवाड बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते, साहित्यिक व नाट्यकर्मी प्रा. वसंत गिरी यांचे एकुलते एक सुपुत्र प्रज्वल वसंत गिरी (वय २६) याचा लोणावळा येथे दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण मेहकर तालुक्यासह शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

प्रज्वल गिरी हा पुणे येथे पदवीत्तर शिक्षण पूर्ण करून सध्या बी.एड.चे शिक्षण घेत होता. त्याचबरोबर तो एमपीएससी परीक्षेची तयारीही करत होता. अत्यंत हुशार, शांत आणि अभ्यासू स्वभावाचा प्रज्वल भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहत होता.

८ फेब्रुवारी रोजी प्रज्वल आपल्या नातेवाईकांसह मुंबईहून पुण्याकडे प्रवास करत होता. प्रवासादरम्यान लोणावळा येथे अल्पोपहारासाठी सर्वजण थांबले. त्यावेळी प्रज्वल व त्याचा मावसभाऊ “थोडा वेळ टेकडीवरून फिरून येतो” असे सांगून जवळच्या टेकडीच्या दिशेने गेले. मात्र, ही सहलच प्रज्वलच्या आयुष्याची अखेरची ठरली.

टेकडी परिसरात फिरत असताना तोल न सांभाळल्याने प्रज्वलचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

प्रज्वलचे वडील प्रा. वसंत गिरी हे मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले नामवंत प्राध्यापक आहेत. ‘वऱ्हाड निघाले लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री प्रयोगाचे त्यांनी महाराष्ट्रभर ५०० पेक्षा अधिक प्रयोग सादर केले आहेत. तसेच क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित विविध नाट्यप्रयोगांचे हजाराहून अधिक सादरीकरण त्यांनी केले आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

अशा कर्तृत्ववान व प्रतिष्ठित कुटुंबावर एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय काल रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले.

प्रज्वल गिरी यांच्या पार्थिवावर मेहकर येथे जानेफळ रोडवरील स्मशानभूमीत मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रज्वलच्या अकाली निधनामुळे मेहकर, पुणे तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, विद्यार्थी आणि नागरिकांकडून गिरी कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!