ढगफुटीसदृश्य पावसाने शेकडो एकरात बळीराजा कोलमडला!

ढगफुटीसदृश्य पावसाने शेकडो एकरात बळीराजा कोलमडला!
वर्दडी, सोनोशी, सोयंदेव, खैरखेड, रुम्हणा, देवखेड आणि किनगाव राजा महसूल मंडळातील सर्व पिके जलमय
किनगावराजा प्रतिनिधी – (असेफ कुरेशी)
सिंदखेडराजा तालुक्यात दिनांक २२ सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते पाच या दरम्यान मुसळधार पावसाचा अक्षरशः कहर झाला. ढगफुटीसदृश्य झालेल्या या पावसामुळे बेलगंगा नदीच्या पात्राबाहेर दोन्ही बाजूला तब्बल चारशे फूटपर्यंत पाणी पसरले. गावोगाव पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे शेकडो एकरातील उभे पीक पाण्याखाली गेले.
शेती व जनावरांचे प्रचंड नुकसान
या आपत्तीमुळे सोयाबीन, कपाशी, उडीद यासह खरीपातील बहुतेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकतेच काढणीस आलेले सोयाबीन पूर्णपणे वाहून गेले, तर पक्व अवस्थेत असलेले कपाशी देखील पूर्णपणे जलमय झाले. अनेक शेतकऱ्यांचे जनावरांसाठी बांधलेले गोठे शेतामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. रात्रीच्या काळोखात हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना जनावरे सोडविण्याचीही संधी मिळाली नाही. परिणामी अनेक जनावरांचा जीव गेला असून शेतकरी केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक धक्काही सहन करत आहेत.सोलर पॅनलचेही नुकसान
नदीकाठच्या शेतात बसवण्यात आलेली सौरऊर्जेची पॅनेल्स हीसुद्धा या पुरात वाहून गेली. लाखो रुपयांची किंमत असलेली ही यंत्रणा जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
किनगाव राजा महसूल मंडळाची स्थिती
या ढगफुटीसदृश्य पावसाचा फटका किनगाव राजा महसूल मंडळालाही बसला आहे. गेले दोन महिने या भागात सतत पाऊस चालू असून शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. सलग पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक, मानसिक व भावनिक संकटात सापडले आहेत.
प्रशासनाचा दौरा आणि पंचनामेआपत्तीची माहिती मिळताच तहसीलदार साहेबांनी तात्काळ पूरग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागाकडून पंचनामे सुरू असून जे शेतकरी हजर नव्हते त्यांचे पंचनामे महसूल सेवकांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
आमदार मनोज कायंदे यांचा तत्पर प्रतिसाद
संध्याकाळी आमदार मनोज भाऊ कायंदे यांनी स्वतः पूरग्रस्त गावांना भेट दिली. परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी प्रशासनातील महसूल, कृषी, पशुसंवर्धन आदी सर्व संबंधित विभागांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. गावकऱ्यांच्या दु:खात मी सदैव सोबत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांवर अस्मानी व भावनिक संकट
या भीषण आपत्तीने शेतकरी हतबल झाला आहे. उभ्या पिकाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, सौर पॅनेल्ससह शेतमालाची झालेली हानी यामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे झालेल्या नुकसानीमुळे मानसिक व भावनिक संकट या दोन्हींचा मोठा आघात शेतकऱ्यांवर झाला आहे.
गावकऱ्यांची अपेक्षा
गावकऱ्यांनी शासनाकडून तातडीने मदत मिळावी, नुकसान भरपाई लवकर द्यावी, तसेच शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.



