कारंजा नगरपरिषदेच्या वतीने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेला सुरुवात
कारंजा : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना चावाघेण्याच्या घटना, भीतीचे वातावरण

कारंजा नगरपरिषदेच्या वतीने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेला सुरुवात
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
कारंजा : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना चावाघेण्याच्या घटना, भीतीचे वातावरण तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता कारंजा नगरपरिषदेच्या वतीने मोकाट कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम कारंजा न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार राबविण्यात येत असून, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन उपाय मानला जात आहे.
नगराध्यक्ष फरीदाबानू पुंजानी आणि मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाने या मोहिमेचे काटेकोर नियोजन केले आहे. एका खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षित पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली कुत्र्यांची शास्त्रशुद्ध आणि मानवी पद्धतीने नसबंदी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचा अमानुषपणा न करता कायदेशीर मार्गानेच ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.
या मोहिमेसाठी दारव्हा रोडवरील मुस्लिम कब्रस्तानाच्या मागील बाजूस टिनपत्र्याचे सुसज्ज ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहे. येथे पकडण्यात आलेल्या मोकाट कुत्र्यांवर आवश्यक तपासणी करून नसबंदी करण्यात येत असून, शस्त्रक्रियेनंतर त्यांना आवश्यक औषधोपचार, देखभाल तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण दिले जात आहे. पूर्णपणे बरे झाल्यानंतर संबंधित कुत्र्यांना पुन्हा त्याच परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे मोकाट कुत्र्यांची अनियंत्रित वाढ रोखली जाणार असून, त्याचे सकारात्मक परिणाम आगामी एक ते दोन वर्षांत निश्चितपणे दिसून येतील, असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे नसबंदीबरोबरच रेबीज प्रतिबंधक लसीकरण केल्यामुळे चाव्याच्या घटनांनंतर मानवी जीवितास निर्माण होणारा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
दरम्यान, शहरातील विविध प्रभागांमध्ये मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण झालेली भीती, अपघातांची शक्यता आणि चाव्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता ही मोहीम अत्यंत आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, मोकाट कुत्र्यांबाबत कोणतीही अडचण, तक्रार किंवा माहिती असल्यास नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.




