शासकीय की पक्षीय सभा? एटापल्लीतील बाल कला व क्रीडा महोत्सवावर राजकारणाच्या छायेचा आरोप”

“शासकीय की पक्षीय सभा? एटापल्लीतील बाल कला व क्रीडा महोत्सवावर राजकारणाच्या छायेचा आरोप”
जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार, एटापल्ली
एटापल्ली (जि. गडचिरोली) येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय बाल कला व क्रीडा महोत्सवावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. शासकीय कार्यक्रम असूनही त्यामध्ये प्रोटोकॉलचे उल्लंघन करून राजकीय हस्तक्षेप केल्याचा गंभीर मुद्दा काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार यांनी उपस्थित केला.
दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी एटापल्ली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत नागुलवार यांनी सविस्तर माहिती देत हे आरोप नोंदवले. जिल्हा परिषद गडचिरोली आणि पंचायत समिती एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नागुलवार यांच्या मते, कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते व्हायचे नियोजित होते. मात्र, ठरलेला प्रोटोकॉल न पाळता आमदारांच्या खुर्चीचा अनादर झाला आणि ध्वजारोहण हर्षवर्धन आत्राम यांच्या हस्ते करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे हा कार्यक्रम सरकारी स्वरूपाचा होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय मेळावा? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.
या व्यतिरिक्त, त्यांनी आर्थिक अनियमिततेचाही मुद्दा उचलला. जिल्हा परिषद निधी उपलब्ध असताना शिक्षकांकडून ५०० ते १००० रुपये अशी वर्गणी का मागवली, तसेच जमा झालेला निधी कुठे खर्च झाला? असा प्रश्न त्यांनी विचारला.
नागुलवार यांनी पुढे सांगितले की, लॉयल्ड मेटल कंपनीच्या CSR निधीतून विद्यार्थ्यांसाठी भोजनव्यवस्था करता आली असती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीन दिवसांच्या कार्यक्रमात शिक्षकांना खर्च उचलावा लागला आणि विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी नोंदवला.
प्रज्वल नागुलवार यांनी या संपूर्ण घडामोडीचा निषेध नोंदवत शासकीय कार्यक्रमाला राजकीय रंग देण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे. आता प्रशासन आणि संबंधित विभागाकडून या प्रकरणी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



