९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा. मधुकर जाधव यांच्या ‘थँक्स तुकोबा’ कवितेने समाजातील कुप्रवृत्तीला दाखवला आरसा
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने स्वराज्याच्या राजधानींपैकी एक असलेल्या सातारा येथे

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा. मधुकर जाधव यांच्या ‘थँक्स तुकोबा’ कवितेने समाजातील कुप्रवृत्तीला दाखवला आरसा
देऊळगाव राजा (प्रतिनिधी : भीमराव चाटे)
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने स्वराज्याच्या राजधानींपैकी एक असलेल्या सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नामवंत कवींनी सहभाग नोंदवला.
या निमंत्रित कवी संमेलनात श्री व्यंकटेश महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव सहभागी झाले होते. त्यांनी सादर केलेल्या ‘थँक्स तुकोबा’ या कवितेने उपस्थित श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मंडपात हे कवी संमेलन संपन्न झाले. समाजातील वाढती दांभिकता, बेईमानी, संकुचित विचारसरणी आणि नैतिक अधःपतन यावर प्रा. मधुकर जाधव यांनी आपल्या कवितेतून परखड भाष्य केले.
तुकाराम महाराजांच्या विचारांचा संदर्भ घेत त्यांनी आजच्या समाजातील वास्तव अधोरेखित करताना म्हटले की—
“तुकोबा तुम्ही घेतल्या हाती चिपळ्या अन् केला सत्याचा गजर
सत्य-असत्याशी मन ग्वाही करून असत्याने घेतली आता सत्याची जागा
चिपळ्यांच्या ऐवजी वाजताहेत चहूकडे
दांभिकतेचा डंका आणि बेइमानीचे चौघडे…”
या ओळींतून समाजात सत्यापेक्षा दिखाव्याला मिळणारे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडले.
तसेच, संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आजच्या काळात होणारा उपहास आणि त्याकडे दुर्लक्ष होण्याबाबत त्यांनी खंत व्यक्त करत पुढील ओळी सादर केल्या—
“असाध्य ते साध्य करण्या अभ्यास करा तुका म्हणे
असे म्हणायचीही सोय राहिली नाही, कारण
ऐकणारा सहज परतवतो सल्ला गांभीर्य लक्षात न घेता
‘तुका म्हणे तर म्हणू दे’ तू का म्हणे?’ अशी हेटाळणी करून…”
या कवितेने उपस्थित रसिकांना अंतर्मुख केले. श्रोत्यांकडून प्रा. मधुकर जाधव यांच्या सादरीकरणाला भरभरून दाद मिळाली.
कवी संमेलनाच्या समारोपप्रसंगी श्रीकांत देशमुख आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीता राजेपवार यांच्या हस्ते प्रा. मधुकर जाधव यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे, तसेच प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांनी प्रा. मधुकर जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




