कारंजा तालुक्यातील यावर्डी येथे बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाचा
रौप्यमहोत्सव २४ ते २६ जानेवारीदरम्यान उत्साहात साजरा

कारंजा तालुक्यातील यावर्डी येथे बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाचा रौप्यमहोत्सव २४ ते २६ जानेवारीदरम्यान उत्साहात साजरा
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
कारंजा तालुक्यालगत असलेल्या यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाने स्थापनेची पंचवीस यशस्वी वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वतीने भव्य रौप्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा रौप्यमहोत्सव सोहळा दिनांक २४ ते २६ जानेवारी या कालावधीत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार असून, या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रौप्यमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार, २४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त व संघभावना निर्माण व्हावी यासाठी झुंबा डान्स, सामूहिक कवायत, तसेच विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी शाळेसाठी महत्त्वाचा ठरणारा कार्यक्रम म्हणजे माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावनाताई गवळी यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या दोन नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या नव्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये लक्षणीय भर पडणार आहे.
या उद्घाटन व रौप्यमहोत्सव कार्यक्रमास कारंजा–मनोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके, शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा संगीताताई शिंदे, ग्रामपंचायत सरपंच विद्याताई आमले, पोलीस पाटील सुनील पाटील ठाकरे, संस्थाध्यक्ष योगेश खोपे, संस्था सचिव हरिदास गंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ व पालकवर्ग उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, २५ जानेवारी रोजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी आपल्या आठवणींना उजाळा देत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. यामुळे जुन्या-नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये संवाद व प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
रविवार, २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, सत्कार समारंभ व भावनिक क्षण अनुभवायला मिळणार आहेत. शाळेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या शिक्षक, कर्मचारी व हितचिंतकांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
या रौप्यमहोत्सव कार्यक्रमाला गेल्या पंचवीस वर्षांत शिक्षण घेतलेले सर्व माजी विद्यार्थी, पालकवर्ग, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी केले आहे.




