शेतकऱ्यांचा आवाज आता जनता दरबारात घुमणार; न्यायासाठी शेतकरी योद्धा कृती समितीचा एल्गार
केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. ना. श्री प्रतापराव जाधव यांच्या जनता दरबारासाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयामार्फत मा. तहसीलदार तथा जनता दरबार समन्वय यंत्रणेकडे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले

शेतकऱ्यांचा आवाज आता जनता दरबारात घुमणार; न्यायासाठी शेतकरी योद्धा कृती समितीचा एल्गार
पत्रकार प्रतिनिधी विशेष सिंदखेडराजा
सिंदखेडराजा, दि. १३ जुलै : शेतकरी योद्धा कृती समिती, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. ना. श्री प्रतापराव जाधव यांच्या जनता दरबारासाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयामार्फत मा. तहसीलदार तथा जनता दरबार समन्वय यंत्रणेकडे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, त्याची अधिकृत पोच प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
निवेदनामध्ये सन २०२५ मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रलंबित पीक विमा व आर्थिक मदत तात्काळ मंजूर करणे, बंद व अकार्यक्षम पर्जन्यमापक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आधुनिक पर्जन्यमापक यंत्रणा बसविणे, दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या अतिवृष्टी व गारपीटीची प्रलंबित मदत वितरित करणे, सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावणे तसेच जनता दरबारामध्ये शेतकरी योद्धा कृती समितीला शेतकरी प्रतिनिधी म्हणून विशेष प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न थेट मांडण्याची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सन २०२५ मधील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पीकच नाही, तर त्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फेरले. हजारो शेतकरी आजही हक्काच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा खासदार मा. ना. श्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली होती. त्यामुळे जनता दरबारात शेतकऱ्यांचा एकच सवाल असणार आहे— “साहेब, आपण आपल्या डोळ्यांनी अतिवृष्टीचे नुकसान पाहिले, मग आजही शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित का? पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाची भूमिका काय आहे? आणि एवढ्या मोठ्या नुकसानीनंतरही पीक विमा मिळत नसेल, तर यावर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा कोणत्या विश्वासावर भरायचा?” या प्रश्नाचे उत्तर आता शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे.
मागील वर्षी अनेक पर्जन्यमापक यंत्रणा बंद अवस्थेत असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची अचूक नोंद झाली नाही. परिणामी अनेक पात्र शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले. शेतकऱ्यांवरील हा अन्याय यापुढे सहन केला जाणार नसल्याची ठाम भूमिका शेतकरी योद्धा कृती समितीने व्यक्त केली आहे.
दि. १८ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या जनता दरबारामध्ये शेतकरी योद्धा कृती समितीला शेतकरी प्रतिनिधी म्हणून विशेष प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न थेट मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. समितीने स्पष्ट केले की, ही संघटना कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर केवळ शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहे.
शेतकरी आज कर्जाच्या बोजाखाली दबला असून, प्रलंबित पीक विम्याकडेच आशेने डोळे लावून बसला आहे. त्यामुळे सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने जनता दरबारात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा. आज आपण शांत राहिलो, तर उद्या पीक विमा, नुकसानभरपाई आणि शेतकऱ्यांच्या इतर न्याय्य हक्कांपासूनही वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. आता गप्प बसण्याची नाही, तर लोकशाही मार्गाने न्याय मागण्याची वेळ आली आहे, असे आवाहन शेतकरी योद्धा कृती समिती, जिल्हा बुलढाणा यांनी केले आहे.
– शेतकरी योद्धा कृती समिती, जिल्हा बुलढाणा




