शेतकरी रडतोय, सरकार झोपलंय; जिजाऊ माऊली, आता तूच न्याय दे!
कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रविकांत भाऊ तुपकर यांच्या उपोषणाला पाठिंबा

शेतकरी रडतोय, सरकार झोपलंय; जिजाऊ माऊली, आता तूच न्याय दे!
विशेष प्रतिनिधी सिंदखेड राजा
कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रविकांत भाऊ तुपकर यांच्या उपोषणाला पाठिंबा; हात जोडून जिजाऊ चरणी शेतकऱ्यांचे साकडे – आमच्या घामाची किंमत सरकारला कधी कळणार?
सिंदखेडराजा, दि. १७ जून : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वारंवार मोडीत निघत असून कर्जमाफी, पीक विमा आणि नुकसानभरपाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक होत असल्याचा तीव्र संताप आज सिंदखेडराजा येथे व्यक्त करण्यात आला.
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काढण्यात आलेल्या कर्जमाफीच्या जीआरमुळे अनेक शेतकरी वंचित राहिले. बुलढाणा जिल्ह्यासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, अनेक ठिकाणी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी नोंदली गेली, शासनाने मदतही जाहीर केली, मुख्यमंत्री यांनी पीक विम्याची घोषणा केली; तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.
या अन्यायाविरोधात शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर बुलढाणा येथे अन्नत्याग उपोषण करत असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र शासन आणि प्रशासन त्यांच्या आंदोलनाकडे कानाडोळा करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र भूमीत, सिंदखेडराजा येथील राजवाड्यात जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेसमोर राज्य सरकारने काढलेला कर्जमाफीचा जीआर ठेवून सरकारला सद्बुद्धी मिळावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी शेतकरी योद्धा कृती समिती, क्रांतिकारी संघटना, लोकजागर परिवार तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, आज प्रश्न कोणत्या पक्षाचा नाही, तर शेतकऱ्याच्या जगण्या-मरण्याचा आहे. शेतकऱ्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या रविकांत भाऊ तुपकर यांच्या पाठीशी प्रत्येक शेतकरी ठामपणे उभा राहिला पाहिजे.
तसेच सरकारने कर्जमाफीच्या जीआरमध्ये तात्काळ दुरुस्ती करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्यावा आणि रविकांत भाऊ तुपकर यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पुढील दोन-तीन दिवसांत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
“शेतकऱ्याच्या घामाला दाम द्या, शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय द्या; अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



