बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजासोशल मीडिया

सिंदखेडराजात उपवर्गीकरण विरोधात निळ्या वादळाचा विराट एल्गार

जय भीम... जय संविधानच्या घोषणांनी शहर दणाणले; हजारोंचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

सिंदखेडराजात उपवर्गीकरण विरोधात निळ्या वादळाचा विराट एल्गार

जय भीम… जय संविधानच्या घोषणांनी शहर दणाणले; हजारोंचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

        सिंदखेड राजा पत्रकार भगवान साळवे,

दि. २८ जुलै

अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवून संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी अनु. जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, सिंदखेडराजा यांच्या वतीने दि. २७ जुलै रोजी सिंदखेडराजा येथे विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर झालेल्या सभेत विविध मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शासकीय विश्रामगृह येथून मोर्चाला सुरुवात झाली. हातात निळे झेंडे, फलक आणि संविधानाच्या समर्थनाचे संदेश घेऊन महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “जय भीम”, “जय संविधान”, “आरक्षण आमच्या हक्काचं”, “संविधानविरोधी उपवर्गीकरण बंद करा” अशा घोषणांनी संपूर्ण शहर परिसर दुमदुमून गेला.

यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनातील प्रमुख मागण्या

– अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी.

– माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल जाहीर करून समिती रद्द करावी.

– अनुसूचित जातीतील बहुसंख्य समाजाचा विरोध लक्षात घेऊन उपवर्गीकरण थांबवावे.

– जातनिहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वेक्षण करून अहवाल प्रसिद्ध करावा.

– शासकीय व निमशासकीय विभागातील अनुशेष (बॅकलॉग) पदे तातडीने भरावीत.

– विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढवाव्यात.

– संविधानातील समानता व सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेऊ नये.

संत सावता महाराज मैदानात झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे समाजात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य केले. शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

मोर्चाचे आयोजन जि.प. सदस्य पंडितराव खंदारे, भाई बबन म्हस्के, मधुकर साळवे, कैलास झिने, योगेश म्हस्के, हिम्मतराव काळे, सुमेध गवई, पत्रकार भगवान साळवे, राहुल झोटे, रामदास कहाळे व मधुकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले

दि. २९ जुलै रोजी बुलढाणा येथे उपवर्गीकरण विरोधात मोठा मोर्चा काढण्यात येणार असून या आंदोलनाचे नेतृत्व समाजनेते आनंदराज आंबेडकर करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

चौकट : समता सैनिकांची शिस्त ठरली चर्चेचा विषय

मोर्चादरम्यान समता सैनिकांनी संपूर्ण कार्यक्रमात उल्लेखनीय शिस्त राखली. हजारोंची गर्दी असूनही मोर्चा अत्यंत नियोजनबद्ध आणि शांततेत पार पडल्याने उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!