बुलढाणामहाराष्ट्रवन विभागविदर्भशेतकरीशेतकरी आत्महत्यासामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

रोही (नीलगायी)च्या कळपाने दोन एकरांतील कपाशी उद्ध्वस्त

शेतकरी राम रतन पवार यांच्यावर दुहेरी संकट

रोही (नीलगायी)च्या कळपाने दोन एकरांतील कपाशी उद्ध्वस्त; शेतकरी राम रतन पवार यांच्यावर दुहेरी संकट

          प्रा. दिलीप नाईकवाड | बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील शेतकरी राम रतन पवार यांच्या गट क्रमांक ५९४ मधील सुमारे दोन एकर क्षेत्रावरील कपाशीचे पीक रोही (नीलगायी)च्या कळपाने अक्षरशः उद्ध्वस्त केले. नुकतीच उगवलेली, अवघ्या अर्धा फूट उंचीची कपाशीची कोवळी रोपे रात्रीच्या अंधारात शेतात घुसलेल्या नीलगायींच्या कळपाने तुडवून, मोडून आणि चिरडून टाकली.

पहिल्यांदा निसर्गाचा मार, त्यानंतर वाढता उत्पादन खर्च, महागडी बियाणे-खते, आणि आता वन्य प्राण्यांचा हल्ला… शेतकरी नेमका जगायचा तरी कसा? हा प्रश्न आज पुन्हा एकदा जांभोरा येथील घटनेने समोर आणला आहे.

घटनास्थळी तुडवलेली कपाशी, जनावरांच्या पायांचे ठसे आणि सर्वत्र झालेली नासधूस पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. काही दिवसांपूर्वी मोठ्या आशेने पेरलेले पीक एका रात्रीत संपुष्टात आले. या पिकावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाची फी, कर्जाचे हप्ते आणि वर्षभराच्या संसाराची स्वप्ने अवलंबून होती. ती स्वप्ने आता अक्षरशः चिरडली गेली आहेत.

जांभोरा परिसरात गेल्या काही वर्षांपासून रोही (नीलगायी)चा वाढता उपद्रव शेतकऱ्यांसाठी कायमची डोकेदुखी ठरला आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा यांसह विविध पिकांचे वारंवार नुकसान होत असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडत आहेत. रात्रभर शेताची राखण करूनही पिके वाचत नाहीत. जीव धोक्यात घालून शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आज स्वतःच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी कोणताही प्रभावी आधार उरलेला नाही.

सरकार वन्यजीवांचे संरक्षण करते, हे योग्यच आहे; मात्र अन्नदाता शेतकऱ्याचे संरक्षण कोण करणार? पिकांचे नुकसान झाले की शेतकऱ्याच्या जखमेवर फक्त आश्वासनांची मलमपट्टी केली जाते. प्रत्यक्ष मदत मात्र वेळेवर मिळत नाही. ही परिस्थिती बदलणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.

शेतकरी राम रतन पवार यांनी महसूल, कृषी व संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच जांभोरा परिसरातील नीलगायींच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनीही शासनाला इशारा देत सांगितले आहे की, वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास शेती करणेच अशक्य होईल. शेतकरी फक्त भरपाई मागत नाही, तर आपल्या घामाने उभ्या केलेल्या पिकाचे संरक्षण मागत आहे. अन्नदात्याचा हा आक्रोश आता शासनाने ऐकला नाही, तर उद्या शेतात उभे राहणारे पीक नव्हे, तर शेतकऱ्याचाच विश्वास संपुष्टात येईल.

फोटो: रोही (नीलगायी)च्या कळपाने जांभोरा येथील शेतकरी राम रतन पवार यांच्या शेतातील उद्ध्वस्त केलेले कपाशीचे पीक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!