खरीप 2025 चे 100% नुकसान मान्य… तरीही पिक विमा शून्य!
दिनांक 27 मार्च रोजी तहसील कार्यालय, सिंदखेडराजा मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे निवेदन व पत्र देण्यात येणार आहे.

“खरीप 2025 चे 100% नुकसान मान्य… तरीही पिक विमा शून्य!”
सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी
शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा
खरीप 2025 मधील अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील विशेषतः सिंदखेडराजा मतदार संघातील शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे पाण्याखाली जाऊन नष्ट झाले. शेतकऱ्यांचा वर्षभराचा घाम आणि मेहनत एका क्षणात सडून गेली. त्या वेळी शेतकरी योद्धा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून आंदोलन केल्यामुळेच प्रशासनाला जाग आली आणि मदत मिळाली, अन्यथा नुकसानाची नोंदही झाली नसती.
आज पिक विम्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून पिक विमा काढला, राज्य सरकारने 100 टक्के नुकसान मान्य केले, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. हा शेतकऱ्यांवरचा मोठा अन्याय आहे.
7 जूनपासून खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांकडे भांडवल नाही. त्यातच खत, बी-बियाणे, औषधे व अवजारांचे दर वाढले आहेत, तर कापूस, सोयाबीन, मका, गहू, हरभरा, मूग, उडीद यांसारख्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्याचीच कोंडी होत असून ही परिस्थिती का निर्माण होते, याचा जाब मिळालाच पाहिजे.
जर भरलेला पिक विमा मिळत नसेल, तर शेतकरी भविष्यात विमा भरणार नाही. यामुळे संपूर्ण पिक विमा योजना धोक्यात येण्याची शक्यता आहे.
दिनांक 27 मार्च रोजी तहसील कार्यालय, सिंदखेडराजा मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे निवेदन व पत्र देण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निवेदनाला ताकद द्यावी, असे जोरदार आवाहन करण्यात येत आहे. हीच योग्य वेळ आहे — आपल्या हक्कासाठी एकत्र उभे राहण्याची! 
जर एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा झाला नाही, तर शेतकरी योद्धा कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्या वेळी शेतकरी आपल्या पिक विम्याच्या पावत्या मंत्रालयासमोर फेकून निषेध नोंदवतील. दम असेल तर प्रशासनाने हे आंदोलन अडवून दाखवावे, असा खुला इशारा देण्यात आला आहे.
आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केल्यास शेतकरी जशास तसे उत्तर देतील, असा इशारा संस्थापक अध्यक्ष श्री. बालाजी सोसे यांनी दिला आहे.
सध्या गावागावातून शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यास तयार असून केवळ औपचारिक आंदोलन करून उपयोग नाही, तर निर्णायक लढा उभारण्याची गरज आहे.
शेतकरी योद्धा कृती समिती सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी एकत्र येऊन पिक विम्यासाठी रस्त्यावर उतरावे. ही लढाई केवळ पिक विम्याची नसून शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे.
आज शेतकरी अडचणीत असताना राजकारण नको, तर एकजूट हवी. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पक्षांचे नेते, शेतकरी नेते व शेतकऱ्यांशी निगडित असणारे सर्व नेतृत्व यांनी पक्षभेद बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे राहावे.
येत्या दिनांक 27 मार्च रोजी सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी, शेतकरी नेते व संबंधित सर्व नेतृत्वांनी मोठ्या संख्येने न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
संस्थापक अध्यक्ष श्री. बालाजी सोसे, लोकजागर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भाऊ गीते तसेच प्रदेश अध्यक्ष श्री. गजानन जायभाये यांनी केले आहे.
शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा



