क्राइमपोलीसभ्रष्टाचारमहाराष्ट्रमहिलाराज्यविदर्भ

ग्रामीण गरीबांच्या स्वप्नांचा खाक! कोट्यवधींची आर्थिक फसवणूक उघड

दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन – भाकपाचा इशारा

ग्रामीण गरीबांच्या स्वप्नांचा खाक! कोट्यवधींची आर्थिक फसवणूक उघड

     जिल्हा प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार एटापल्ली

दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन – भाकपाचा इशारा

एटापल्ली | प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार

एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. जादा परताव्याचं आमिष दाखवून गरीब, शेतकरी, मजूर व आदिवासी बांधवांकडून कष्टाचे पैसे गोळा करून दोन कंपन्यांनी गाशा गुंडाळल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात ‘सुविधा फार्मिंग अँड अलाईड लिमिटेड’ आणि ‘क्रिएटिव्ह इंडिया मल्टी स्टेट ॲग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ या कंपन्यांनी स्थानिक एजंटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाळं पसरवलं.

“ही कंपनी शासनमान्य आहे, तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे, कमी वेळात जादा परतावा मिळेल,” अशी खोटी आश्वासनं देत शेकडो कुटुंबांकडून लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले.

कंपन्या अचानक गायब, कुटुंबं उद्ध्वस्त

काही महिन्यांपर्यंत सुरळीत व्यवहार सुरू असल्याचं भासवण्यात आलं. मात्र अचानक या कंपन्यांचे कार्यालय बंद पडले, एजंटांचे मोबाईल बंद झाले आणि गुंतवणूकदारांना ना मुद्दल मिळालं ना व्याज.

या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, मुलांचं शिक्षण, आजारपणावरील उपचार आणि दैनंदिन खर्चासाठी ठेवलेले पैसे पूर्णपणे बुडाले आहेत.

या प्रकरणात सत्यनारायण पुज्जलवार, प्रतिमा जोरदार, कुमारेश जोरदार, संजय पुज्जलवार, आरती पुज्जलवार, जोसेफ बारावा, राजेश कुजूर, सुरेश कुजूर, जुलेश कुजूर, जगमा कुजूर यांसह अनेक कुटुंबांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं समोर येत आहे.

भाकपाचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना निवेदन

या गंभीर प्रकरणाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला असून, भाकपाचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड रमेश कवडो यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

“गुन्हे दाखल झाले नाहीत, तर रस्त्यावर उतरू” – भाकपाचा इशारा

भाकपाच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला की,

“गरीब जनतेची आर्थिक लूट करणाऱ्या कंपन्यांचे संचालक, व्यवस्थापक आणि स्थानिक एजंटांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत, तसेच पीडितांचे पैसे व्याजासह परत मिळाले नाहीत, तर आम्ही संपूर्ण तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडू.”

मुख्य मागण्या

भाकपाने प्रशासनासमोर पुढील ठाम मागण्या मांडल्या आहेत –

संबंधित कंपन्यांच्या संचालक व व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत

स्थानिक एजंटांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी

पीडित गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत मिळवून द्यावेत

भविष्यात अशा फसवणुका होऊ नयेत यासाठी कठोर नियंत्रण यंत्रणा राबवावी

प्रशासनाची भूमिका काय?

या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, दोषींवर तात्काळ कारवाई होणार का, की गरीब व आदिवासी बांधवांच्या स्वप्नांचा खाक असाच उडत राहणार—असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचं लक्ष एटापल्लीकडे लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!