जयंतीधर्मबुलढाणामहाराष्ट्रराज्यविदर्भसिंदखेड राजा

सिंदखेडराजा विकास आराखड्यांतर्गत वीररत्न जिवाजी

महाले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची नाभिक समाजाची जोरदार मागणी

सिंदखेडराजा विकास आराखड्यांतर्गत वीररत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची नाभिक समाजाची जोरदार मागणी

              प्रा. दिलीप नाईकवाड | बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक व पवित्र भूमी असलेल्या सिंदखेडराजा नगरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे वीररत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा सिंदखेडराजा विकास आराखड्यांतर्गत उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात दिनांक १९ जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात वीररत्न जिवाजी महाले यांनी अत्यंत निष्ठेने आणि शौर्याने कार्य केले. “लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी आपल्या आयुष्यातील निर्णायक क्षणी उच्चारले होते. स्वराज्यासाठी आणि महाराजांच्या संरक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे त्यांचे बलिदान केवळ नाभिक समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.
सिंदखेडराजा ही भूमी ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून याच ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्म झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आजोळ असून, येथेच स्वराज्याच्या विचारांची बीजे रोवली गेली. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन, मावळ्यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अशा पवित्र आणि ऐतिहासिक शहरामध्ये स्वराज्यरक्षक वीराचा सन्मान करणारा पूर्णाकृती पुतळा उभारणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार, सिंदखेडराजा विकास आराखड्यांतर्गत नाव्हा रोड व देऊळगाव राजा रोड या प्रमुख ठिकाणी वीररत्न जिवाजी महाले यांचा भव्य व देखणा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, जेणेकरून भावी पिढ्यांना त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची प्रेरणा मिळेल.
या निवेदनावर नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष हरिदास जाधव, जिल्हा मुख्य सचिव डॉ. प्रकाश सवडतकर, तालुकाध्यक्ष विलास चित्रे, शहराध्यक्ष प्रदीप जाधव, तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव, विजय बाबडे, शिवानंद वैद्य, गजानन राऊत, विष्णू वैद्य, राम राऊत, रामेश्वर जाधव आदींसह समस्त नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून, हे निवेदन बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.
या मागणीमुळे सिंदखेडराजा शहराच्या ऐतिहासिक गौरवात भर पडेल, तसेच स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीराचा यथोचित सन्मान होईल, अशी भावना नाभिक समाज व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!