मंगरुळपीर तालुक्यातील नांदखेडा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या रस्त्यामुळे संतापाची लाट — प्रशासन अजूनही ढिम्म!

मंगरुळपीर तालुक्यातील नांदखेडा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या रस्त्यामुळे संतापाची लाट — प्रशासन अजूनही ढिम्म!
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार–शेंदुरजना मोरे मार्गे नांदखेडा या अतिदुर्गम गावाकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या मृत्यूचा सापळा ठरत आहे. वाशिम जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या नांदखेडा गावाकडे जाणारा हा एकमेव रस्ता पूर्णपणे उघडलेला, खड्डेमय व अक्षरशः नामशेष अवस्थेत पोहोचला असून, या रस्त्यामुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच रुग्णांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची अवस्था इतकी भयंकर झाली आहे की, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे झाले आहे. अनेक वेळा या रस्त्यावरून जाताना विद्यार्थी अपघातग्रस्त झाले असून, काही विद्यार्थी गंभीर जखमीही झाले आहेत. तरीसुद्धा संबंधित विभाग आणि प्रशासनाला याची कसलीही पर्वा नाही, हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे.
काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही वर्षांतच संपूर्ण रस्ता उघडलेला आहे. संबंधित ठेकेदाराने आजतागायत कोणतीही दुरुस्ती केलेली नसून, दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या रस्त्यामुळे केवळ वाहतूकच नव्हे तर नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. सततच्या धक्क्यांमुळे सांधे दुखी, मान व कंबरदुखीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून, वृद्ध नागरिक व महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे कठीण झाले असून, एखादी गंभीर घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण व जीवित दोन्ही धोक्यात आले आहे. प्रशासनाला आणि सरकारला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जाणीव तरी आहे का? असा संतप्त प्रश्न नांदखेडा ग्रामस्थ, पालक आणि ऑटो युनियन उपस्थित करत आहेत.
“किमान विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे पाहून तरी सरकारने जागे व्हावे,” अशी आर्त मागणी ग्रामस्थांनी केली असून, तात्काळ रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नांदखेडा ग्रामस्थ, ऑटो युनियन व नागरिक मिळून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आता प्रशासनाने केवळ कागदी आश्वासने न देता, तात्काळ रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे ठोस काम सुरू करावे, अन्यथा उद्रेक झालेल्या जनआक्रोशाची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनावरच राहील, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.




