अवैध धंदे व वाहतुकीचा बोजवारा; ठाणेदारांची बदली करण्याची मागणी

अवैध धंदे व वाहतुकीचा बोजवारा; ठाणेदारांची बदली करण्याची मागणी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
कारंजा (लाड) शहरात सुरू असलेले अवैध धंदे, बेशिस्त वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेचा बिघडलेला
ताळमेळ याबाबत पोलीस स्टेशन कारंजा शहरचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या अतिरिक्त मुदतवाढीविरोधात तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट)चे नेते सुधाकर प्रभुजी गर्जे यांनी यासंदर्भात कारंजा-लाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कारंजा शहर व परिसरात मटका, सट्टा, वरली मटका, टेबल जुगार, एमडीसारखे अंमली पदार्थ, रेशनिंग धान्याचा काळाबाजार तसेच अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सर्व प्रकारांवर ठाणेदारांकडून ठोस व प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. परिणामी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांना वारंवार कारंजा परिसरात धाडी टाकाव्या लागत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये खुलेआम मटक्याच्या चिठ्या फाडल्या जात असल्याचे चित्र असून जुगाराचे अड्डेही सर्रास सुरू असल्याचे गर्जे यांनी सांगितले. तसेच विना कागदपत्रांची वाहने, ऑटोरिक्षांची नियमबाह्य वाहतूक वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूककोंडी, वादविवाद आणि किरकोळ भांडणांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून शहरात वाहतूक नियोजनाचा पूर्ण अभाव जाणवत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
वाहतूक व फेरीवाल्यांबाबत तक्रार केल्यावर पोलीस प्रशासनाकडून “हे नगर परिषदेचे काम आहे” असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ठाणेदार शुक्ला यांचा नियोजित कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कोणतेही ठोस कारण नसताना त्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्यावर गर्जे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या कार्यकाळात कारंजा परिसरात गुन्हेगारी वाढल्याचा दावा करत बनावट नोटा, गुटखा माफिया व इतर अवैध कारवायांमध्ये वाढ झाल्याचेही निवेदनात नमूद आहे.
ही अतिरिक्त मुदतवाढ तत्काळ रद्द करून ठाणेदारांची बदली करण्यात यावी, अशी ठाम मागणी गर्जे यांनी केली असून अन्यथा वरिष्ठ पातळीवर आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



