१२ जानेवारीला सिंदखेड राजात जिजाऊ जन्मोत्सवाचा महासागर उसळणार
देश-विदेशातून लाखो जिजाऊ-शिवभक्तांची उपस्थिती अपेक्षित

१२ जानेवारीला सिंदखेड राजात जिजाऊ जन्मोत्सवाचा महासागर उसळणार
देश-विदेशातून लाखो जिजाऊ-शिवभक्तांची उपस्थिती अपेक्षित
सिंदखेड राजा : विशेष प्रतिनिधी
जगाला शिवबा देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीत यंदा पुन्हा एकदा इतिहास जागा होणार आहे. मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या ४२८ व्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी अवघा महाराष्ट्रच नव्हे तर देश-विदेशातून लाखो जिजाऊ भक्त व शिवभक्त दाखल होणार आहेत. या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जन्मोत्सव समितीचे सचिव सुभाषराव कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३ जानेवारीपासून सुरू झालेला सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव सध्या उत्साहात सुरू असून, या कालावधीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रम रंगतदारपणे पार पडत आहेत. या स्पर्धांचे बक्षीस वितरण ११ जानेवारी रोजी मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या हस्ते होणार आहे.
११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिजाऊंच्या जन्मस्थळी असलेल्या लखुजी राजे जाधव राजवाड्यावर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने भव्य दीपोत्सव साजरा होणार आहे. सिंदखेड राजा शहरासह परिसरातील माताभगिनी घराघरातून दिवे आणून राजवाड्यावर प्रज्वलित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ४२८ मशालींसह राजवाड्यापासून शहरात भव्य मशाल यात्रा निघणार असून, या यात्रेत सर्व धर्मीय महिलांचा मोठा सहभाग असणार आहे.
सायंकाळी ६.३० वाजता शिवधर्मपीठ जिजाऊ सृष्टी येथे ‘जिजाऊ गीतायन’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, सातारा व पुणे येथील नामवंत कलाकार आपल्या सुरांनी जिजाऊंचा गौरव करतील. रात्री ८.३० वाजता राज्यभरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
मुख्य जन्मोत्सव दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता जिजाऊ जन्मस्थळ राजवाड्यावर मराठा सेवा संघाच्या दहा प्रमुख जोडप्यांच्या उपस्थितीत महापूजेने होणार आहे. सकाळी ७ वाजता वारकरी दिंडी सोहळा भव्य पालखीने राजवाड्यापासून जिजाऊ सृष्टीकडे प्रस्थान करेल. सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहण होणार आहे.
सकाळी १० वाजता शिवधर्मपीठ येथे मुख्य सोहळ्यास सुरुवात होईल. यामध्ये सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन, शिवशाहीर गुलाबराव नळणीकर, युवा शाहीर सतीश कुरंगळ यांच्यासह राज्यातील नामवंत शाहिरांचे पोवाडे सादर होणार आहेत. याचवेळी विविध मान्यवरांचे विशेष सत्कार, प्रकाशन सोहळे तसेच मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची मनोगते होणार आहेत.
दुपारी १.३० ते ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर भूषवणार असून, विविध लोकप्रतिनिधी, संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सुमारे २० सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याच मंचावर मराठा तंत्रभूषण, शिक्षण भूषण, कृषी भूषण, क्रीडा भूषण आणि जिजाऊ पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
यंदा सर्व कार्यक्रम जिजाऊ सृष्टी येथेच होत असल्याने तब्बल २०० बाय ६०० फूट आकाराचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. परिसरात ४०० पुस्तक स्टॉल, १०० भोजन स्टॉल, वाहनतळ व निवासाची विस्तृत सोय करण्यात आली आहे. बहुजन विचारधारेवरील साहित्य, शिक्षण-कृषी मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दालनेही आकर्षण ठरणार आहेत.
१३ जानेवारी रोजी संत चोखामेळा जन्मोत्सवानिमित्त मेव्हणा राजा येथे सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, १४ जानेवारी रोजी सकाळी महापूजेने जिजाऊ जन्मोत्सव व संत चोखामेळा महाराज समाजप्रबोधन सोहळ्याची सांगता होणार आहे.
या महासोहळ्यासाठी मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षांच्या विविध समित्या कार्यरत असून, पदाधिकारी व कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. यंदाचाही जिजाऊ जन्मोत्सव प्रेरणादायी, विचारांना दिशा देणारा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरेल, असा ठाम विश्वास सुभाषराव कोल्हे यांनी व्यक्त केला.




