कठीण परिश्रम आणि मजबूत ध्येय असल्यास जीवनाचा विकास अटळ — सहाय्यक आयुक्त दीपक मांटे
शालेय जीवन व महाविद्यालयीन वयामध्ये कष्ट, त्याग आणि संघर्ष सहन करून कठीण परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही.

कठीण परिश्रम आणि मजबूत ध्येय असल्यास जीवनाचा विकास अटळ — सहाय्यक आयुक्त दीपक मांटे
प्रा. दिलीप नाईकवाड बुलढाणा
शालेय जीवन व महाविद्यालयीन वयामध्ये कष्ट, त्याग आणि संघर्ष सहन करून कठीण परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. अभ्यासाच्या काळात जाणीवपूर्वक कष्ट करणाऱ्यांचेच जीवन पुढे यशस्वी होते, असे प्रतिपादन नागपूर विभागाचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तथा जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दीपक मांटे यांनी केले.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटनपर भाषणात भावुक होत आयुक्त दीपक मांटे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. “मी एका खेड्यातून आलेला सर्वसामान्य विद्यार्थी होतो. या शाळेने मला घडवलं, शिक्षक व प्राध्यापकांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं. आज मी जे काही आहे, त्यामागे जीवन विकास विद्यालय व येथील शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे,” असे सांगताना ते भारावून गेले.
या शाळेचे माझ्यावर फार मोठे उपकार असून त्याची परतफेड करणे कधीच शक्य नाही. मात्र या शाळेसाठी, येथील विद्यार्थ्यांसाठी किंवा संस्थेसाठी जे काही करता येईल, जिथे माझी आवश्यकता भासेल तिथे मी सदैव उभा राहीन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अभ्यासाबाबत एक प्रभावी संदेश दिला. “अभ्यासाच्या दिवसात जे जास्त झोप घेतात, त्यांना आयुष्यभर जागून संघर्ष करावा लागतो. आणि जे अभ्यासाच्या काळात कमी झोपून मेहनत करतात, ते आयुष्यभर सुखी राहतात. याचे जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कष्ट, शिस्त आणि सातत्य यांचा अंगीकार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर बुलढाणा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी तथा माजी विद्यार्थी जगन मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रसिद्ध व्याख्याते जीवनराव देशमुख (अकोला) यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करत जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त अशा अनेक जीवनमंत्रांची माहिती दिली.
स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी लोकशिक्षण संस्था, किनगाव राजाचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. तर संस्थेचे सचिव राजे गणेशराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गणेश भांगे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. रवींद्र धनावत, पर्यवेक्षक डी. एल. वायाळ, तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष व माजी सरपंच छगनभाई खंदारे, राजेश गुंजाळ, बाबुराव खंदारे, कृष्णा जराड, आम्रपाली काळे, डॉ. शिवाजी खरात, माजी प्राचार्य भगवान मस्के, नितीन बापू देशमुख, महिला शिक्षिका प्रतिनिधी मंदाताई हुसे, पत्रकार रमेश कोंडाणे, बाळासाहेब भोसले, माजी प्रा. नरेंद्र पोटोडे, प्रा. प्रभाकर देशमुख, शिक्षकेतर कर्मचारी अशोक शेवलकर, नारायण महाडिक, विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी एनसीसी पथसंचलन (परेड) सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर गुणदर्शन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये, नाट्यप्रयोग व सांस्कृतिक सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. जे. राजे जाधव यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे ठरले.




