लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे ४० पत्रकारांचा पुरस्कारांनी सन्मान

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे ४० पत्रकारांचा पुरस्कारांनी सन्मान

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांची भरगच्च उपस्थिती शेतकरी न्यूज व न्यूज मराठी-24×7, तालुका प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे
प्रतिनिधी / राजेश पाटील खारोडे अकोला
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतीय समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या वतीने स्थानिक जठारपेठ चौकातील जैन रेस्ट्रो सभागृहात पत्रकार दिनानिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत असलेल्या एकूण ४० पत्रकारांचा शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये “लोकस्वातंत्र्य पत्रकार भूषण सेवा गौरव” व “लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता गौरव” हे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अकोला शहर व जिल्ह्यातील पत्रकारांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे हे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, दैनिक नवभारतचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश शुक्ला, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, स्तंभलेखक प्रा. मोहन खडसे, लोकमत समाचारच्या वृत्तसंपादिका निशाली पंचगाम, दैनिक देशोन्नतीचे वृत्तसंपादक माणिकराव कांबळे, श्रमिक पत्रकार संघाचे महेंद्र कवीश्वर, खामगाव येथील पत्रकार संघाचे पदाधिकारी जगदीश अग्रवाल व सागर मोदी, तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी केले. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकार बंधू-भगिनींच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, पत्रकारांचे कार्य देशरक्षण करणाऱ्या सैनिकासारखे असते. समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करून सुदृढ समाज निर्माण करण्याची महत्त्वाची जबाबदारी पत्रकार पार पाडत असतात.
महेंद्र कवीश्वर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकारांनी लिहिलेली एखादी लहानशी बातमी देखील मोठा सामाजिक बदल घडवू शकते. पत्रकारांनी निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे काम केल्यास समाजातील अपप्रवृत्तींना निश्चितच त्यांचा धाक राहील.
दैनिक नवभारतचे प्रतिनिधी दिनेश शुक्ला म्हणाले की, बदलत्या युगात पत्रकारितेत कितीही आधुनिकता आली तरी प्रिंट मीडियाचे महत्त्व ध्रुवताऱ्यासारखे कायम अबाधित राहील. प्रा. मोहन खडसे यांनी पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजहितासाठी आपली लेखणी झिजवावी, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रदीप खाडे म्हणाले की, पत्रकारांनी जनतेसमोर सत्य परिस्थिती ठामपणे मांडली पाहिजे. मात्र हे कार्य करत असताना स्वतःच्या सुरक्षिततेची व कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याप्रसंगी प्रख्यात समाजसेवक धनंजय मिश्रा, पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख, मराठी साहित्य संघाचे सदस्य व युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, प्रा. किरण वाघमारे, बुडन गाडेकर, समाजसेवक गजानन हरणे, नारायणराव अंधारे, अनिल मावळे, श्रीकृष्ण माळी, राजेंद्र खारोडे, सिद्धेश्वर देशमुख, सागर लोडम, मनोहर मोहोड, नवले, सतीश देशमुख यांच्यासह सुमारे ९० पत्रकार व मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. जया भारती यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. दिपाली यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



