बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त एटापल्ली येथे भव्य कार्यक्रम
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनाच्या औचित्याने

बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त एटापल्ली येथे भव्य कार्यक्रम
जिल्हा: प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनाच्या औचित्याने एटापल्ली येथे पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून असलेल्या भूमिकेचा गौरव करणारा भव्य व विचारप्रवर्तक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अमर राऊत (भा.प्र.से.), तहसीलदार हेमंत गांगुर्डे, नगराध्यक्ष रेखाताई मोहुर्ले, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन कदम, गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधडे, गटशिक्षणाधिकारी रुतिकेश बुरडकर, बालविकास अधिकारी बुरीवार, संस्कार संस्थेचे संस्थापक विजय सुंकेपाकवार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रामगुंडेवार, लॉयड्स कंपनीचे प्रतिनिधी, निवृत्त DySP शिंदे, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकातून प्रशांत मंडल यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या निर्भीड व समाजप्रबोधनात्मक पत्रकारितेचा आढावा घेत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तनुज बल्लेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद चव्हाण यांनी केले.
यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सत्य, निर्भीडता व जनहित या मूल्यांवर आधारित पत्रकारितेची आजच्या डिजिटल युगात अधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले. खोट्या माहितीविरोधातील लढा, सामाजिक न्याय, पारदर्शकता आणि लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी जबाबदार भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांनी प्रशासन व पत्रकार यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी जनहितवादी पत्रकारितेचे कौतुक केले, तर नगराध्यक्ष रेखाताई मोहुर्ले यांनी स्थानिक विकास प्रक्रियेत पत्रकारांचे योगदान अमूल्य असल्याचे नमूद केले. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन कदम यांनी सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था राखण्यात पत्रकारांची सकारात्मक भूमिका अधोरेखित केली.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे नव्या पिढीमध्ये पत्रकारितेबाबत जाणीव, आदर व सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. एकूणच बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा ठाम संदेश यातून देण्यात आला.



