महाराष्ट्रवाशिमविदर्भशेतकरीसरकारी योजना

‘पी.एम. विश्वकर्मा’ योजनेची जास्तीत जास्त प्रचार–प्रसिद्धी करा

वाशिम जिल्हा कौशल्य व उद्योजकतेचे केंद्र म्हणून विकसित होणार

‘पी.एम. विश्वकर्मा’ योजनेची जास्तीत जास्त प्रचार–प्रसिद्धी करा

वाशिम जिल्हा कौशल्य व उद्योजकतेचे केंद्र म्हणून विकसित होणार

— जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

         वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

वाशिम, (जिमाका):

पारंपरिक कारागिरांना आधुनिकतेशी जोडून त्यांना आर्थिक, तांत्रिक व डिजिटलदृष्ट्या सक्षम बनविणारी ‘पी.एम. विश्वकर्मा’ योजना ही केवळ आर्थिक सहाय्यापुरती मर्यादित नसून सर्वांगीण विकासाची प्रभावी योजना आहे. वाशिम जिल्ह्यातील पारंपरिक कारागिरांमध्ये मोठी गुणवत्ता आणि नाविन्य दडलेले असून, शासनाच्या विविध योजनांचा योग्य वापर केल्यास ते स्वतःचा व्यवसाय वाढवून रोजगारनिर्मिती करू शकतात. प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. तसेच संबंधित विभागांनी ‘पी.एम. विश्वकर्मा’ योजनेची जास्तीत जास्त प्रचार–प्रसिद्धी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयांतर्गत एमएसएमई विकास कार्यालय, नागपूर यांच्या वतीने स्थानिक कारागिर व उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मन्नासिंह चौक, शुक्रवार पेठ येथील स्वागत लॉनमध्ये तीन दिवसीय ‘पी.एम. विश्वकर्मा’ प्रदर्शनी व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन वाशिम–मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते तर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.

यावेळी आमदार श्याम खोडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून सुरू झालेली ‘पी.एम. विश्वकर्मा’ योजना ही पारंपरिक कारागिरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारी आहे. देशातील कुशल कारागिर हे ‘आत्मनिर्भर भारत’चे खरे शिल्पकार असून, त्यांच्या कलेला बाजारपेठ मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. वाशिमसारख्या कृषीप्रधान जिल्ह्यात हस्तकला, लघुउद्योग व घरगुती उद्योगांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अशा प्रदर्शनांमुळे कारागिरांना थेट ग्राहक मिळतो, मध्यस्थ टळतो आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळतो. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन वाशिम जिल्हा कौशल्य व उद्योजकतेचे केंद्र म्हणून पुढे यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास एमएसएमई विकास कार्यालय नागपूरचे निदेशक डॉ. व्ही. आर. सिरसाठ, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घूले, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी श्री. बघेल यांनी प्रास्ताविक करत ‘पी.एम. विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण, स्वस्त कर्ज, आधुनिक साधने व बाजारपेठेशी जोडणीद्वारे कारागिरांना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा संकल्प स्पष्ट केला.

प्रदर्शनात १८ प्रकारच्या कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, लाकडी व लोखंडी साहित्य, पारंपरिक खाद्यपदार्थ, शेतीपूरक व घरगुती उद्योगातील उत्पादने तसेच नाविन्यपूर्ण वस्तू नागरिकांना पाहायला मिळत आहेत. या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळून ‘स्वदेशी उत्पादनांना बळ, कारागिरांना सन्मान’ ही संकल्पना प्रभावीपणे रुजेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

दरम्यान जिल्हाधिकारी, आमदार श्याम खोडे व उपस्थित मान्यवरांनी विविध स्टॉलना भेट देऊन कारागिरांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे संचालन निता मेहरे (जोशी) यांनी केले. मोठ्या संख्येने नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!