कतलीसाठी नेणारी अवैध वाहतूक उधळली; 10 जनावरांची सुटका
मंगरूळनाथ तालुक्यातील वनोजा–समुद्री टोलनाका रोडवर गोवंशाची अवैधरीत्या वाहतूक करणारी पिकअप

कतलीसाठी नेणारी अवैध वाहतूक उधळली; 10 जनावरांची सुटका
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
मंगरूळनाथ तालुक्यातील वनोजा–समुद्री टोलनाका रोडवर गोवंशाची अवैधरीत्या वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडण्यात येऊन दहा जनावरांची सुटका करण्यात आली. मंगरुळपीर पोलिस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी मिळून ही कारवाई केली. या संयुक्त कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर होणारा गोवंशाचा बेकायदा पुरवठा थांबवण्यात पोलिसांना यश मिळाले.
ही घटना ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे साडे पाचच्या दरम्यान घडली. शेलूबाजार–वनोजा मार्गावरून मोठ्या प्रमाणात जनावरे कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित वाहनांच्या तपासणीसाठी सापळा तयार केला. दरम्यान, महिंद्रा पिकअप (क्रमांक MH 49 BZ 5058) संशयास्पदरीत्या वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने अडथळा उभारून वाहनाचा पाठलाग केला आणि काही अंतरावर वाहन थांबवण्यात यश आले.
वाहनाची तपासणी केल्यावर चार गाई, तीन गोरे व तीन बैल असे एकूण दहा जनावरे अतिशय निर्दयीपणे कोंबून भरलेली आढळली. वाहतुकीदरम्यान जनावरांवर अत्यंत अमानुष पद्धतीने वागणूक दिल्याचेही स्पष्ट झाले. यामुळे जनावरांचे प्राण धोक्यात आले होते. या कारवाईत वाहनचालक रोशन रमेश सोनुने वय ३६, वर्षे याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. फरार आरोपीचा शोध पोलीस पथकाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या कारवाईत पिकअप गाडींसह सुमारे ₹४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश संरक्षण कायद्यानुसार तसेच इतर संबंधित कलमांनुसार मंगरुळपीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी पोलिस व विविध सामाजिक संघटना सातत्याने प्रयत्नरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जनावरांची अमानुष वाहतूक रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




