शेलूबाजार–शेंदुर्जना (मोरे) रस्ता ठेकेदाराच्या मनमानीमुळे चाळणीसारखा; शेतकऱ्यांचे हाल, प्रशासन झोपेतच
मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदुर्जना (मोरे)–वनोजा–नांदखेडा हा रस्ता म्हणजे शेतकऱ्यांचा

शेलूबाजार–शेंदुर्जना (मोरे) रस्ता ठेकेदाराच्या मनमानीमुळे चाळणीसारखा; शेतकऱ्यांचे हाल, प्रशासन झोपेतच?
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदुर्जना (मोरे)–वनोजा–नांदखेडा हा रस्ता म्हणजे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा श्वास आहे. याच रस्त्यावरून शेतकरी आपली शेतीमाल बाजारात आणतो, रुग्ण दवाखान्यात जातो, विद्यार्थी शाळेत पोहोचतो. पण आज हाच रस्ता ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे अक्षरशः चाळणीसारखा झाला असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खोल गड्डे, उखडलेला डांबर, साचलेले पाणी आणि धुळीचे लोट यामुळे शेतकऱ्यांचे वाहन चालवणे म्हणजे जिवावर बेतले आहे. ट्रॅक्टर, बैलगाडी, दुचाकी तर सोडाच; रुग्णवाहिकादेखील या रस्त्यावरून जाताना अडखळते. एखादा अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार, असा सवाल संतप्त शेतकरी विचारत आहेत.
काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम कागदावरच दर्जेदार आणि प्रत्यक्षात मात्र अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पहिल्याच पावसात रस्ता उघडा पडला, म्हणजे ठेकेदाराने किती प्रामाणिक काम केले याचा अंदाज येतो. तरीही संबंधित ठेकेदारावर कारवाई नाही, दुरुस्ती नाही आणि प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच दिसून येत आहे.
या रस्त्यावरून जाणारा शेतकरी रोज शिव्या खात खात, जीव मुठीत धरून प्रवास करतो. बाजारात पोहोचायला उशीर होतो, शेतीमालाचे नुकसान होते, खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होते. आधीच नैसर्गिक संकटांनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांना हा रस्ता नवा शाप ठरत आहे.
या गंभीर प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते विलास लांभाडे व सौ. सविता विलास लांभाडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, तातडीने रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी व दर्जेदार, टिकाऊ रस्ता तयार करावा, अशी ठाम मागणी केली आहे.
जर प्रशासनाने या प्रश्नाकडे पुन्हा डोळेझाक केली, तर शेतकरी व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्याचा संयम संपत चालला आहे. आता तरी प्रशासनाने कागदावर नव्हे तर जमिनीवर उतरून काम करावे, अशी जोरदार मागणी सर्व स्तरांतून होत आहे.




