शिवनेरी–पुरंदर पिता-पुत्र भेटीच्या ऐतिहासिक पालखीचा पुरंदर किल्ल्यावर भव्य समारोप
स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र शिवनेरी गड

शिवनेरी–पुरंदर पिता-पुत्र भेटीच्या ऐतिहासिक पालखीचा पुरंदर किल्ल्यावर भव्य समारोप

नाशिक येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र शिवनेरी गड ते पुरंदर गड या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पिता–पुत्र भेटीच्या ऐतिहासिक पायी दिंडी पालखी सोहळ्याचा समारोप आज गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी पुरंदर किल्ल्यावर अत्यंत शांततेत व उत्साहात पार पडला. या उपक्रमाला यंदा आठ वर्षे पूर्ण होत असून मावळ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांच्या नियोजनाखाली, आंबेगाव तहसील पिंपळगाव खडकी येथील स्वराज्य संघाचे संस्थापक मार्गदर्शक बांगर महाराज यांच्या नेतृत्वात हा पायी दिंडी सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी असलेल्या शिवनेरी गडावर दि. ५ जानेवारी रोजी देवीची आरती करून पालखी सोहळ्याची विधिवत सुरुवात करण्यात आली.
या पायी दिंडीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे, पंडित महाराज मोडक, रमेश येवले यांच्यासह असंख्य मावळे सहभागी झाले होते. दिंडीने संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलेल्या पवित्र भूमीत विधिवत स्नान विधी पार पाडण्यात आला. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दर्शन घेत दिंडी वढू बुद्रुक येथे पोहोचली, जिथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले.
आज दि. ९ जानेवारी रोजी पायी दिंडी पुरंदर किल्ल्यावर दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पिता–पुत्र भेटीच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी मावळ्यांमध्ये प्रचंड उत्साह व आनंदाचे वातावरण होते. स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा पिता–पुत्र भेटीचा पायी दिंडी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत आणि यशस्वीपणे पार पडला.
हा उपक्रम इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याची प्रेरणा जपणारा असून पुढील पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवण्याचे कार्य स्वराज्य संघाच्या माध्यमातून सातत्याने सुरू असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील


