ट्रॅक्टर रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यु
तालुका कोपरगाव अंतर्गत खिर्डी गणेश येथे आज एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली
ट्रॅक्टर रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यु
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
तालुका कोपरगाव अंतर्गत खिर्डी गणेश येथे आज एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली. स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतीकाम करत असताना रोटावेटरमध्ये घाण अडकल्याने ती काढण्यासाठी शेतकरी खाली उतरले. मात्र रोटावेटर बंद न केल्याने चालू अवस्थेतील रोटावेटरने त्यांना ओढून घेतले व या भीषण अपघातात त्यांचा जागीच गंभीर अपघात झाला.
या अपघातात श्री. बाळनाथ (साहेबराव) पूंजाबा रोहम (रा. खिर्डी गणेश) यांचा आज दुपारी सुमारे १ वाजता अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे खिर्डी गणेशसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी मंदाबाई बाळनाथ रोहम, मुले कालिदास, सोपान, विनायक (विजय), सुना तसेच नातवंड असा मोठा परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता अमरधाम, खिर्डी गणेश येथे करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रवासादरम्यान रस्त्यावर ही घटना पाहून तत्काळ घटनास्थळी पोहोचून छायाचित्रे व माहिती पाठवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रायते येथील उपसरपंच सुदर्शन गोठी यांनी केले.
ही घटना केवळ अपघात नसून, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतीकामात झोकून देतो. मात्र शेती यंत्रांच्या वापरात थोडीशी चूक झाली तरी त्याला जीव गमवावा लागत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, वन्यप्राण्यांचा धोका, कर्जबाजारीपणा अशा विविध संकटांत अडकलेला असताना अशा अपघातांमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र, प्रभावी व तत्काळ लाभ देणारी अपघात विमा योजना लागू करावी, तसेच शेती यंत्रांच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती व प्रशिक्षण सक्तीचे करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांनीही स्वतः ट्रॅक्टर व इतर शेती अवजारे चालवत असताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असून, कोणतेही यंत्र बंद केल्याशिवाय दुरुस्ती अथवा अडथळा काढण्याचे काम करू नये, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.
शोकाकुल : रोहम परिवार, खिर्डी गणेश




