वाघाळा शिवारात आंब्याला बहर, मात्र निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या
विशेषतः बायगाव बुद्रुक, तालुका देऊळगाव राजा येथील शेतकरी

वाघाळा शिवारात आंब्याला बहर, मात्र निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या
वाघाळा | प्रतिनिधी : योगेश काकड
वाघाळा शिवारातील रान परिसरात सध्या आंब्याच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात मोहर फुटल्याने संपूर्ण शेती शिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील सलग लावगड केलेल्या आमराईंसह शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या सक्रीत व गावरान आंब्याच्या झाडांवर भरघोस फुलोरा दिसून येत आहे. झाडांच्या फांद्या मोहोरांनी अक्षरशः लदबुदून गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आंब्याला भरपूर मोहर आला असला, तरी निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या आशा धूसर होताना दिसत आहेत. अवकाळी हवामानातील बदल, अचानक तापमानातील चढउतार व वाऱ्याच्या झुळकांमुळे आंब्याचा मोहर गळून पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मेहनतीने जोपासलेल्या आंब्याच्या झाडांवरील फुलोरा गळून पडताना पाहून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः बायगाव बुद्रुक, तालुका देऊळगाव राजा येथील शेतकरी शंकर नागरे (क्ष. कि. वै. अधिकारी) यांच्या शेतातील आंबा मोहोर हा निसर्गाच्या या प्रतिकूलतेचा जिवंत दाखला ठरत आहे. भरघोस मोहर येऊनही तो टिकेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे.
आंबा हे अनेक शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन असल्याने मोहर गळतीमुळे पुढील हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, तसेच कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन व उपाययोजना सुचवाव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
छायाचित्र : पत्रकार योगेश काकड, गजानन नागरे (शेतकरी योद्धा कृती समितीचे देऊळगावराजा उपतालुका प्रमुख)




