वैष्णवी गडावर मकर संक्रांतीची भक्तिमय यात्रा; हरिनामाच्या गजरात लाखो पावले विठ्ठल चरणी
सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा तालुक्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक व श्रद्धेच्या वैष्णवी गडावर मकर संक्रांतीनिमित्त भक्ती, श्रद्धा

वैष्णवी गडावर मकर संक्रांतीची भक्तिमय यात्रा; हरिनामाच्या गजरात लाखो पावले विठ्ठल चरणी
वैष्णवी (ता. सिंदखेडराजा): पत्रकार गजानन सोनवणे
सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा तालुक्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक व श्रद्धेच्या वैष्णवी गडावर मकर संक्रांतीनिमित्त भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर येथे मोठ्या उत्साहात यात्रोत्सव साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विठ्ठल–रुक्माईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी गडाच्या पायथ्यापासूनच पाहायला मिळाली.
“ज्ञानोबा–तुकाराम” आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” या नामघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर भाविक भक्तिभावाने दर्शन घेत होते. अनेक भाविकांनी नवस, उपवास, अभिषेक, पूजा-अर्चा करून विठ्ठल चरणी मनोभावे प्रार्थना केली.
मकर संक्रांतीनिमित्त गड परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते. खेळणी, दागिने, पूजेचे साहित्य, तिळगुळ, मिठाई, उस, फुले अशा विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. महिलांसह लहान-मोठ्या भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. यात्रेमुळे परिसरात चैतन्य, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पावन पर्वावर अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वाण देत संक्रांती साजरी केली. तिळगुळाची देवाणघेवाण करत “तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला” हा सामाजिक एकोप्याचा आणि सौहार्दाचा संदेश देण्यात आला. परंपरा, संस्कृती आणि धार्मिक मूल्यांचे दर्शन या यात्रेतून घडले.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नियोजनामुळे यात्रा शांततेत व सुरळीत पार पडली.
भक्ती, श्रद्धा, परंपरा, बाजारपेठेचा उत्साह आणि सामाजिक एकतेचा संगम अनुभवायला मिळाल्याने मकर संक्रांतीचा सण वैष्णवी गडावर अत्यंत भक्तिमय आणि आनंदोत्सवी वातावरणात साजरा झाला. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली.



