येवला तालुक्यातील प्रमुख मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडी; नागरिक, विद्यार्थी व शेतकरी त्रस्त
येवला तालुक्यातील विंचूर चौफुली ते मनमाड रोड, शिर्डीकडे जाणारा कोपरगाव रोड तसेच वैजापूर रोड या

येवला तालुक्यातील प्रमुख मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडी; नागरिक, विद्यार्थी व शेतकरी त्रस्त
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
येवला तालुक्यातील विंचूर चौफुली ते मनमाड रोड, शिर्डीकडे जाणारा कोपरगाव रोड तसेच वैजापूर रोड या प्रमुख आणि अत्यंत वर्दळीच्या मार्गांवर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, या कोंडीमुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सकाळच्या वेळेपासूनच या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. परिणामी काही मिनिटांचा प्रवास अर्धा ते एक तास लांबतो, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
या मार्गांवरून दररोज शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेसला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, नोकरी-व्यवसायासाठी शहरात ये-जा करणारे नागरिक, रुग्णवाहिका, दुचाकी-चारचाकी वाहनधारक तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळेत शाळेत पोहोचता न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नोकरदारांना उशिरा कार्यालयात पोहोचावे लागत आहे.
वाहतूक पोलीस प्रशासनाकडून कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक नियंत्रण कोलमडले असल्याची नागरिकांची भावना आहे. “दररोज कोंडी होते, पण उपाय मात्र नाहीत. ही वाहतूक कोंडी थांबणार कधी?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून वारंवार विचारला जात आहे.
या वाहतूक कोंडीमुळे आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, काही निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रवासी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असतानाही प्रशासनाकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, याच प्रमुख मार्गांवरून येवला बाजार समितीकडे शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात. मात्र वाहतूक कोंडीमुळे ट्रॅक्टर, पिकअप, ट्रक व इतर मालवाहू वाहने वेळेवर बाजार समितीत पोहोचू शकत नाहीत. परिणामी लिलाव प्रक्रिया उशिरा सुरू होते. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून, त्यांना दिवसभर बाजार समितीत थांबावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येवर तातडीने पर्यायी मार्गांची व्यवस्था, जड वाहनांसाठी वेगळा वेळ निश्चित करणे, चौफुल्यांवर कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करणे तसेच दीर्घकालीन नियोजन करून रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिक, प्रवासी आणि शेतकरी वर्गाकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र शासन व प्रशासनाकडून अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे




