वाघाळा येथे रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
वाघाळा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी

वाघाळा येथे रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
वाघाळा प्रतिनिधी : योगेश काकड
वाघाळा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी त्रिशरण पंचशील घेत सामाजिक समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या मिरवणुकीत गावातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
मिरवणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ खीर वाटप करण्यात आले. सामाजिक एकोपा व बंधुभाव जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास वाघाळा गावाचे सरपंच विष्णू काकड, उपसरपंच सखाराम माळेकर, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चव्हाण, बाळू बनसोडे, अमोल भारशकर, कुलदीप चव्हाण, विनोद लाखे, भगवान खरात, दादाराव खरात, बबन सानप यांच्यासह लोकनेते न्यूजचे वाघाळा प्रतिनिधी योगेश काकड तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माता रमाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात दिलेल्या त्याग, संघर्ष आणि प्रेरणेला उजाळा देत ही जयंती सामाजिक ऐक्य, समता व बंधुभावाच्या संदेशाने साजरी करण्यात आली.




