आरोग्य सेवाआरोग्य सेवा हीच ईश्वर सेवाएटापल्लीगडचिरोलीग्रामीण रुग्णालयमहाराष्ट्रविदर्भसामाजिक कार्यकर्तेसोशल मीडियास्वच्छताहॉस्पिटल

ग्रामीण रुग्णालय एटापल्लीमध्ये डॉक्टरांची बेजबाबदारपणा उघड

उपचाराधीन रुग्ण पळाला; डॉक्टरांची उद्धट व असंवेदनशील भाषा

ग्रामीण रुग्णालय एटापल्लीमध्ये डॉक्टरांची बेजबाबदारपणा उघड

उपचाराधीन रुग्ण पळाला; डॉक्टरांची उद्धट व असंवेदनशील भाषा

नागरिकांमध्ये तीव्र संताप – कारवाई कधी?

            जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार

ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरिब जनतेच्या जीवित रक्षणासाठी उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय एटापल्लीमध्येच रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कर्तव्यावर असताना वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव आळे यांनी अत्यंत निष्काळजीपणा करत उपचार सुरू असलेल्या मानसिक अस्थिर अवस्थेतील रुग्णाला रुग्णालयाबाहेर जाण्यास मोकळीक दिली. परिणामी संबंधित रुग्ण रुग्णालयातून पळून गेला असून त्याच्या जीवितास थेट धोका निर्माण झाला आहे.

ही घटना केवळ साधी चूक नसून, रुग्ण सुरक्षेवर केलेला निर्लज्ज आणि बेजबाबदार हल्ला असल्याचा आरोप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी केला आहे. ग्रामीण रुग्णालय हे सुरक्षिततेचे केंद्र असावे की जीव धोक्यात घालणारे ठिकाण, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

मानसिक अस्थिर रुग्ण उपचारादरम्यान रुग्णालयातून बाहेर जाणे हे वैद्यकीय गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते. सुदैवाने संबंधित रुग्ण काही वेळाने हनुमान मंदिर परिसरात आढळून आल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र जर रुग्णास काही अनुचित घटना घडली असती, अपघात झाला असता किंवा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर याची जबाबदारी कोणाची राहिली असती, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

या घटनेबाबत जाब विचारला असता डॉ. वैभव आळे यांनी

“तो दोन पायांनी पळून गेला, तुम्हाला काय करायचं आहे ते करून घ्या”

अशी अत्यंत उद्धट, असंवेदनशील आणि शासकीय सेवकास न शोभणारी भाषा वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही भाषा केवळ नागरिकांचा अपमान करणारी नसून संपूर्ण वैद्यकीय पेशालाच काळिमा फासणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

इतकेच नव्हे तर घटनेनंतर अनेक वेळा पाहणी करूनही संबंधित डॉक्टर आपल्या कक्षात अनुपस्थित आढळून आले. संपर्क साधल्यावर “बाथरूमला गेलो होतो”, “पाणी आणायला गेलो होतो” अशी बालिश व विसंगत कारणे देण्यात आली. कर्तव्याच्या वेळेत अशी गैरहजेरी म्हणजे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप होत आहे.

या संपूर्ण प्रकारात

वैद्यकीय आचारसंहिता

शासकीय सेवावर्तन नियम

रुग्ण हक्क संरक्षण कायदे

यांचा उघडपणे भंग झाल्याचे स्पष्ट दिसून येते. अशा अधिकाऱ्यांना पदावर ठेवणे म्हणजे भविष्यातील गंभीर दुर्घटनांना निमंत्रण देण्यासारखे असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

या प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करून

डॉ. वैभव आळे यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी

तात्काळ बदली अथवा निलंबन करावे

अशी ठाम आणि स्पष्ट मागणी करण्यात येत आहे.

जर प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र जनआंदोलन, वरिष्ठ स्तरावर तक्रारी तसेच कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असा थेट इशारा नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. या संभाव्य आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!