अपघातक्राइमपाणीमहिलावाशिमसामाजिक कार्यकर्तेसोशल मीडियाहॉस्पिटल

खेळता-खेळता विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू;

संत गाडगे बाबा बचाव पथकाची तत्पर कारवाई, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह

खेळता-खेळता विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू;

संत गाडगे बाबा बचाव पथकाची तत्पर कारवाई, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह

    वाशिम जिल्हा प्रतिनिधी – विश्वास कुटे

मंगरूळपीर–वाशिम मुख्य मार्गावरील विद्युत केंद्राजवळ 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. वीटभट्टीवर मजुरीसाठी स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंबातील तीन वर्षीय चिमुकली कु. सुंदरी धनसिंग सीसोदिया (वय 3, रा. झीर पांजरीया, ता. नेपानगर, जि. बुरहानपूर) ही खेळता-खेळता वीटभट्टीलगत असलेल्या उघड्या व संरक्षक उपायांशिवाय असलेल्या विहिरीत पडली. या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना केवळ अपघात नसून मानवी निष्काळजीपणा, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सुरक्षेअभावी घडलेली दुर्घटना असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. वीटभट्टी परिसरात काम करणाऱ्या मजुरांची लहान मुले दिवसभर असुरक्षित परिसरात वावरत असताना उघड्या विहिरी, खड्डे व धोकादायक ठिकाणांवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

घटना निदर्शनास येताच विटभट्टीवरील मजूर व स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करत तात्काळ मंगरूळपीर पोलिसांना माहिती दिली. पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेत मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले.

पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल, अपूर्व चेके, लखन खोडे, शुभम भोपळे, शिवा अडात व सिद्ध इंगोले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत, खोल पाणी व चिखल असूनही धाडसाने शोधकार्य सुरू ठेवले. जवळपास एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले. ही कारवाई त्यांच्या तत्परतेचे व मानवतेचे जिवंत उदाहरण ठरली.

मात्र, प्रश्न असा आहे की – ही दुर्घटना घडायलाच हवी होती का?

वीटभट्टी मालकांनी उघड्या विहिरींना संरक्षण भिंत, जाळी किंवा झाकण का बसवले नाही?

कामगारांच्या मुलांसाठी सुरक्षित जागा, अंगणवाडी किंवा देखरेख व्यवस्था का नाही?

प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांची वेळोवेळी तपासणी का केली नाही?

या दुर्दैवी घटनेत एका निष्पाप जीवाची किंमत मोजावी लागली असून, आता तरी प्रशासन, कामगार विभाग व वीटभट्टी मालकांनी जागे होऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. उघड्या विहिरी, खड्डे तात्काळ बुजवावेत, सुरक्षा कुंपण अनिवार्य करावे आणि स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र योजना राबवाव्यात, अन्यथा अशा घटना पुन्हा घडत राहतील.

अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा गेलेला जीव परत येणार नाही; मात्र तिच्या मृत्यूतून तरी धडा घेऊन भविष्यातील निष्पाप जीव वाचवले गेले, तरच तिला खरी श्रद्धांजली ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!