महाराष्ट्रमहिलालाडकी बहीण सरकारी योजनासरकारी योजनासावित्रीबाई फुले

वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचा ठाम निर्धार : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील KYC काम करण्यास स्पष्ट नकार

वाशिम : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे

वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचा ठाम निर्धार : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील KYC काम करण्यास स्पष्ट नकार

          वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

वाशिम : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे KYC (Know Your Customer) करण्याचे अतिरिक्त काम अंगणवाडी सेविकांवर सोपवण्याच्या निर्णयाविरोधात वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत. हे काम त्यांच्या मूळ सेवाशर्तींमध्ये बसत नसल्याने व न्यायालयीन आदेशांचा भंग करणारे असल्याचा ठाम आरोप करत सेविकांनी एकमुखाने या कामास गैरसहकार्याचा इशारा दिला आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मते, मा. सर्वोच्च न्यायालय तसेच महिला व बालविकास विभाग, नवी दिल्ली यांनी यापूर्वी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित व मूळ कामकाजाबाहेरील कोणतेही योजना-बाह्य काम देणे बेकायदेशीर आहे. असे असतानाही स्थानिक पातळीवर काही प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका व पर्यवेक्षिका यांच्यामार्फत सेविकांवर KYC करण्याचा दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप सेविकांनी केला आहे.

अंगणवाडी सेविका या बालकांचे पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण, गरोदर महिला व स्तनदा मातांची काळजी, आरोग्य जनजागृती, लसीकरण समन्वय आणि समुदाय विकास यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. या कामांवर आधीच मोठा ताण असताना, शासनाने योजना-बाह्य कामांचा अतिरिक्त बोजा टाकणे हे अंगणवाडी व्यवस्थेच्या मूळ उद्दिष्टांनाच बाधा आणणारे असल्याची भावना सेविकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न आजही शासन दरबारी प्रलंबित आहेत. नियमित पेन्शन योजना, ग्रॅच्युइटी, वाढीव मानधन, प्रोत्साहन भत्ते, कामगार म्हणून कायदेशीर हक्क व ठोस सेवा संरचना यांसारख्या मूलभूत मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सेविकांनी केला. हे प्रश्न सोडवण्याऐवजी नव्या योजना राबवण्यासाठी सेविकांवर सक्ती करणे अन्यायकारक व मनमानी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

काही प्रकल्पांमध्ये KYC काम न केल्यास नोटीस देण्याची, कामावरून काढण्याची भीती दाखवली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, अशा दबावाला भीक न घालण्याचा निर्धार वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी केला आहे. “कोणत्याही सेविकेला बेकायदेशीर नोटीस दिली किंवा धमकावण्याचा प्रयत्न केला, तर अशा नोटिसांचा जाहीर निषेध करण्यात येईल आणि त्यांची होळी करण्यात येईल,” असा कडक इशारा सेविकांनी दिला आहे.

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका संघटित होत असून, मोठ्या संख्येने आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने तातडीने यासंदर्भात स्पष्ट आदेश काढून अंगणवाडी सेविकांवर योजना-बाह्य कामाची सक्ती थांबवावी, अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही सेविकांकडून देण्यात आला आहे.

या घडामोडींमुळे वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!