जय गजाननजयंतीधर्ममहाराष्ट्रवाशिम

श्री संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवासाठी भाविकांना विनम्र आवाहन

श्री संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवासाठी भाविकांना विनम्र आवाहन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे कारंजा (लाड) :

कारंजा शहरातील धार्मिक व आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या, श्री कामाक्षा देवी संस्थान समोरील शहर पोलीस स्टेशन प्रांगणात वसलेल्या शहरातील पहिल्या व पुरातन अशा श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांचा प्रगटदिन महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षी माघ वद्य सप्तमी, रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री संत गजानन महाराजांचा पावन प्रगटदिनोत्सव साजरा केला जाणार असून, या निमित्ताने मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

या महोत्सवानिमित्त महाभिषेक, भजन-पूजन, हरिनाम जप, पालखी व नगर परिक्रमा यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी पालखी सोहळ्याने संपूर्ण शहरात भक्तीचा जागर होणार असून, भाविकांच्या उपस्थितीत वातावरण अत्यंत मंगलमय होणार आहे.

तसेच, या पवित्र सोहळ्याच्या समारोपप्रसंगी महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी शहरासह परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याने, महाप्रसादाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

या पावन प्रगटदिन महोत्सवात भाविकांनी स्वेच्छेने तन-मन-धनाने सहभाग घ्यावा, तसेच महाप्रसादासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य, साहित्य किंवा आर्थिक देणगी मंदिरात स्वतःहून अर्पण करून श्रींच्या सेवेत आपला खारीचा वाटा उचलावा, असे विनम्र आवाहन सेवाधारी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर महोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, भक्ती, सेवा, समर्पण व सामाजिक एकोप्याचे प्रतीक असल्याचेही सेवाधारी मंडळींनी नमूद केले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती श्रींचे निष्ठावंत भक्त तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!