धर्ममहाराष्ट्रयात्रा महोत्सववाशिमविदर्भसांप्रदायिक

सिंधी समाज पंचायतच्या अध्यक्षपदी हभप. भगवान खेमवानी यांची निवड

संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने भव्य जाहीर सत्कार

सिंधी समाज पंचायतच्या अध्यक्षपदी हभप. भगवान खेमवानी यांची निवड

संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने भव्य जाहीर सत्कार

कारंजा (लाड) | वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

कारंजा (लाड) येथील सिंधी समाजातील श्रद्धास्थान असलेले, दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूरची अखंड वारी करणारे एकमेव सिंधी समाजातील वारकरी, निःस्वार्थी वृत्तीचे, मनमिळाऊ व हास्यमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे तसेच धार्मिक-आध्यात्मिक विचारसरणीचे हभप. भगवान खेमवानी यांची सिंधी समाज पंचायतच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

हा सत्कार सोहळा हभप. भगवान खेमवानी यांच्या नातवाच्या यज्ञोपवित संस्कार कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे आयोजन जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ, कारंजा, तसेच मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, समाजसेवक संजय कडोळे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हभप. भगवान खेमवानी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रदीप विनायकराव वानखडे, श्यामजी घारू, रोमिल लाठीया, उमेश अनासाने, कैलास हांडे, माणिकराव हांडे, सुनील गुंठेवार, बच्चुभाऊ केसवानी, मोहन पंजवानी, रवी पंजवानी, मोतीलाल परयाणी, रुपेश गढवाले, राजाभाऊ शेळके, रुपेश त्रिवेदी, श्रीपाद रेवाळे, विनित गोलेच्छा, विजय खंडार, विनोद गणवीर, मोनाली गणवीर आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना हभप. भगवान खेमवानी यांना भावना अनावर झाल्या असून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहायला मिळाले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. “सिंधी समाजाची सेवा, सामाजिक एकोपा आणि वारकरी संप्रदायाचे कार्य हीच माझी खरी उपासना आहे. भविष्यातही समाजसेवा व अध्यात्माच्या कार्यात निष्ठेने कार्यरत राहीन,” असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हा सत्कार सोहळा कारंजा शहरात सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक ऐक्याचे दर्शन घडवणारा ठरला असून हभप. भगवान खेमवानी यांच्या कार्याला मिळालेली ही पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!