छत्रपती शिवाजी महाराजजय जिजाऊजयंतीबुलढाणामहाराष्ट्रमहिलाविदर्भसावित्रीबाई फुलेसिंदखेड राजा

संविधान हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक; आमचे हिंदुत्व समतेवर आधारित – पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते आपल्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहे.

संविधान हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक; आमचे हिंदुत्व समतेवर आधारित – पुरुषोत्तम खेडेकर

           प्रा. दिलीप नाईकवाड | बुलढाणा

भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते आपल्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहे. संविधानाच्या मूळ हस्तलिखित प्रतीत मोहनजोदडो, हडप्पा संस्कृतीपासून रामायण, महाभारत, जैन-बौद्ध परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, अकबर, टिपू सुलतान यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांची चित्रे आहेत. त्यामुळे संविधान हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक असून मराठा सेवा संघाच्या हिंदुत्वाला कोणताही विरोध नाही. मात्र आमचे हिंदुत्व हे माँ जिजाऊ, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित असून ते समता व मानवतेवर उभे आहे, असे स्पष्ट मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टी, बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या विचारपीठावर माजी आमदार रेखाताई खेडेकर, शिक्षक आमदार किरण सरनाईक, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, नवनाथ घाडगे, कामाजी पवार, राजे विजयसिंह जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, चंद्रशेखर शिखरे, मधुकर मेहेकरे, अर्जुनराव तनपुरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, गंगाधर बनबरे, सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, सुभाष कोल्हे, वारकरी परिषदेच्या ज्योतीताई जाधव, पांडुरंग पाटील, उर्मिलाताई हाडे, रमेश ढगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळी नऊ वाजता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे व माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खेडेकर म्हणाले की, सध्या जग उजव्या विचारसरणीकडे झुकत असून सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक दहशतवाद कसा कमी करता येईल यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. समाजात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक एकोपा वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत.

मराठा सेवा संघाच्या कार्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, आज ५० टक्क्यांहून अधिक कुटुंबांतील दुसरी पिढी संघटनेच्या ३३ कक्षांशी जोडलेली नाही. या पिढीशी संवाद साधून त्यांना पुन्हा संघटनेशी जोडण्याचे काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनरेशन झेड तसेच अल्फा-बीटा पिढीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

मराठा सेवा संघाने मांडलेल्या पंचसूत्री – शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रसारमाध्यमांची सत्ता – यावर मराठा समाजाने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आमदार व खासदार सत्तेत पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मराठा समाजाबाबत बोलताना खेडेकर म्हणाले की, मराठ्यांचा खरा शत्रू मराठाच आहे. त्यामुळे आत्मपरीक्षण करून नव्या पिढीशी संवाद साधणे आवश्यक आहे. वाचन-लेखन संस्कृती वाढवून भारतीय व परदेशी भाषा आत्मसात करत युवकांनी उंच भरारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जात, धर्म, वंश किंवा प्रांत वेगळे नाहीत, ही भावना समाजात रुजवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा संदेश दाखविण्यात आला. यावेळी मराठा विश्व भूषण पुरस्कार कैलास काटकर, मराठा शिक्षण भूषण पुरस्कार प्रा. रामदास झोळ, जिजाऊ पुरस्कार गंगा कदम, मराठा कृषी भूषण पुरस्कार अमृतराव देशमुख तसेच मराठा क्रीडा भूषण पुरस्कार रितेश केरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात प्रेरणादायी गीत सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवी चेके पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन दिलीप चौधरी व अर्चना चौधरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!