शालेय अभ्यासक्रमात साप व वन्यजीवांचे वैज्ञानिक ज्ञान समाविष्ट करण्याची मागणी – सर्पतज्ञ वनिता बोराडे

शालेय अभ्यासक्रमात साप व वन्यजीवांचे वैज्ञानिक ज्ञान समाविष्ट करण्याची मागणी – सर्पतज्ञ वनिता बोराडे
बुलढाणा | प्रतिनिधी – प्रा. दिलीप नाईकवाड
शालेय अभ्यासक्रमात साप व वन्यजीवांचे वैज्ञानिक ज्ञान समाविष्ट करण्याची मागणी – सर्पतज्ञ वनिता बोराडे यांचा शासनाकडे आग्रह
बुलढाणा | प्रतिनिधी – प्रा. दिलीप नाईकवाड
राज्याच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये साप व वन्यजीवांविषयी वैज्ञानिक, शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ माहितीचा समावेश करण्यात यावा, अशी ठोस व आग्रही मागणी जगातील पहिल्या महिला सर्परक्षक व सर्पतज्ञ वनिता बोराडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. त्यांनी आपल्या सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने शिक्षण विभाग व वन विभागाला यासंदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील रहिवासी असलेल्या वनिता बोराडे यांनी ही मागणी प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेत येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा विषय विधिमंडळात मांडावा, यासाठी सर्व पक्षीय आमदारांची भेट घेण्याची मोहीम राबवली आहे. या अंतर्गत त्यांनी आमदारांकडून तारांकित प्रश्न उपस्थित व्हावा यासाठी प्रश्नाची नोटीस, मसुदा तसेच साप व वन्यजीव विषयक शास्त्रीय-वैज्ञानिक माहितीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून दिला आहे.
या मागणीसाठी आमदार भावना ताई गवळी, आमदार अमित झनक, आमदार किरण सरनाईक, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार धीरज लिंगाडे व आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याशी प्रत्यक्ष भेटी घेऊन सखोल चर्चा करण्यात आली. तसेच हे निवेदन प्रधान मुख्य शिक्षण सचिव, प्रधान मुख्य वन सचिव, महामहीम राज्यपाल, मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
पर्यावरणीय असंतुलन व अभ्यासक्रमातील पोकळी
सध्याच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास, वनक्षेत्रांवरील मानवी अतिक्रमण, जैवविविधतेचा नाश तसेच साप व वन्यजीवांविषयी समाजात असलेले अज्ञान व गैरसमज गंभीर स्वरूप धारण करत आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण व शहरी भागात सर्पदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम मानवासह पशुधनाच्या जीवितावर होत आहे.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच पर्यावरणाविषयी संवेदनशीलता, निसर्गाबद्दल योग्य दृष्टीकोन आणि साप व वन्यजीवांविषयी वैज्ञानिक माहिती देणे अत्यावश्यक असल्याचे वनिता बोराडे यांनी नमूद केले. बालवयात दिलेले योग्य ज्ञान भविष्यात पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संवर्धन व संशोधन कार्यासाठी पोषक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्पदंश प्रतिबंधासाठी शिक्षणाची गरज
ग्रामीण भागातील शेतकरी तसेच शहरी भागातील नागरिकांचा सापांशी वारंवार सामना होत असल्यामुळे भीतीचे प्रमाण मोठे आहे. भीती व अज्ञानातून सापांची अनावश्यक हत्या, चुकीची उपचारपद्धती आणि वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे मृत्यूच्या घटना घडत आहेत.
विषारी, बिनविषारी आणि निमविषारी सापांविषयी प्रमाणित व शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना दिल्यास –
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळता येतील,
सापांची निरर्थक हत्या थांबेल,
मानव-साप संघर्ष कमी होईल,
आणि पर्यावरणातील जैवसंतुलन टिकून राहण्यास मदत होईल,
असा ठाम विश्वास वनिता बोराडे यांनी व्यक्त केला आहे.
भारताची गंभीर स्थिती – अभ्यासक्रम अनिवार्य
ऑस्ट्रेलियासारख्या देशात विषारी सापांची संख्या अधिक असूनही सर्पदंशामुळे मृत्यूचे प्रमाण जवळपास शून्य आहे. मात्र भारतात बिनविषारी सापांची संख्या अधिक असतानाही सर्पदंश मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. भीती, मानसिक धक्का आणि योग्य जनजागृतीचा अभाव ही त्यामागची मुख्य कारणे आहेत.
सोयरे वनचरे फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी अंदाजे २.५ ते ३.५ लाख नागरिक सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात, तर एकट्या महाराष्ट्रातच ३० ते ४० हजार मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता जीव-जमीन-जल-जंगल यांच्याशी निगडित विषयांचे मूलभूत शिक्षण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर साप, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन यांचा समावेश शालेय पाठ्यक्रमात करण्याबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी
सर्पतज्ञ वनिता बोराडे यांनी केली आहे.




