राहिरी येथे नामांतर लढ्याच्या शहीदांना अभिवादन
भव्य नामांतर स्मृती सोहळा; शौर्यस्तंभ पूजनाने इतिहासाला उजाळा

राहिरी येथे नामांतर लढ्याच्या शहीदांना अभिवादन
भव्य नामांतर स्मृती सोहळा; शौर्यस्तंभ पूजनाने इतिहासाला उजाळा
सिंदखेड राजा प्रतिनिधी गजानन सोनवणे
सिंदखेड राजा : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी तब्बल १७ वर्षे चाललेल्या ऐतिहासिक नामांतर लढ्यात बलिदान दिलेल्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राहिरी (पूल), ताढेगाव फाटा, ता. सिंदखेड राजा येथे दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी श्रद्धा, संघर्ष आणि अस्मितेच्या भावनेतून भव्य नामांतर स्मृती सोहळा पार पडला.
या लढ्याचे खरे श्रेय शहीद भीमसैनिकांनाच जाते, अशी भावना यावेळी सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे, यासाठी महाराष्ट्रभर आंदोलने झाली. त्या संघर्षात राहिरी येथील पूल हा संघर्षभूमीचा साक्षीदार ठरला. याच ठिकाणी नामांतर चळवळीतील भीमसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी येथे भव्य शौर्यस्तंभ उभारण्याचा संकल्प यावेळी पुन्हा अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमात राज्यमंत्री दर्जा प्राप्त भाई जयदीप जोगेंद्र कवाडे, चरणदास इंगोले प्रदेश कार्यध्यक्ष
प्रतिभाताई कवाडे, भाई विजय गवई, भाई सावळे यांच्या हस्ते शौर्यस्तंभाचे विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी मधुकर शिंदे, प्रवीण गीते, डॉ. ज्ञानेश्वर नागरे, भाई दिलीप खरात, अर्जुन काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नामांतर लढ्याचा इतिहास उलगडताना वक्त्यांनी स्पष्ट केले की, १९७८ साली महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने ठराव मंजूर करूनही तब्बल १७ वर्षांचा संघर्ष करावा लागला आणि अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” हे नामांतर झाले. हा विजय कोणत्याही सरकारचा उपकार नसून रस्त्यावरच्या संघर्षातून मिळवलेला हक्क आहे, असे ठामपणे नमूद करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रवीण गीते म्हणाले की, संघर्षातूनच चळवळी उभ्या राहतात आणि त्या संघर्षाच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठीच हा सोहळा आहे. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला संघर्ष नव्या पिढीच्या इतिहास म्हणून जतन केला गेला पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण आपली अस्मिता स्थळे जपली पाहिजेत.
रस्त्यावरच्या सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानी नेण्याचा प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणजे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहेत. माझ्यासारखी असंख्य माणसे त्यांच्याशी जुळलेली आहेत, हेच त्यांचे खरे यश आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भविष्यात भीमा-कोरेगावप्रमाणे प्रेरणादायी स्मारक राहिरी येथे उभे राहावे, नव्या पिढीला या ऐतिहासिक संघर्षाची जाणीव व्हावी, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला असंख्य भीमसैनिक व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांनी प्रभावी शब्दांत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला वैचारिक उंची दिली.
नामांतर दिन हा केवळ स्मरणाचा नव्हे, तर सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्ये जपण्याचा निर्धार करण्याचा दिवस आहे, असा ठाम संदेश या स्मृती सोहळ्यातून देण्यात आला.




