पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय; मार्गी लावण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा – आमदार अमित झनक

पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय; मार्गी लावण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा – आमदार अमित झनक
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे रिसोड :
शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी, शेतात ये-जा करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील दळणवळणासाठी पांदण रस्त्यांचे महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे. पांदण रस्ता हा केवळ वाट नसून शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेला जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पांदण रस्ते मोकळे व विकसित करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी परस्पर समन्वयाने विशेष पुढाकार घ्यावा, असे आवाहन रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी केले.
रिसोड येथील तहसील कार्यालयात १ जानेवारी रोजी मुख्यमंत्री पांदण रस्ता योजना तसेच विविध घरकुल योजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा सचिव वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण, शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव सरनाईक व त्यांचे सहकारी, गटविकास अधिकारी खुळे, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, कृषी अधिकारी मगनदास तावरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता अभिषेक देशमुख तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान पांदण रस्त्यांच्या कामात येणारे अडथळे, मोजणीसंबंधी अडचणी, अभिलेख अद्ययावत करण्याची गरज, तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विभागांमध्ये योग्य समन्वय न झाल्यामुळे अनेक ठिकाणी कामे रखडत असल्याचे निदर्शनास आले असून, यापुढे अशा अडचणी येऊ नयेत यासाठी स्पष्ट आणि ठोस सूचना देण्यात आल्या.
यावेळी आमदार अमित झनक यांनी स्पष्टपणे सांगितले की, यापुढे कोणताही पांदण रस्ता मोकळा करताना मोजणीसाठी शेतकऱ्यांनी कोणतेही पैसे भरायचे नाहीत. मोजणीची प्रक्रिया शासनामार्फत मोफत केली जाणार असून, त्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्तही विनामूल्य उपलब्ध करून दिला जाईल. प्रशासन यासाठी संपूर्ण सहकार्य करेल. शक्य ते सर्व प्रश्न ग्रामपंचायत पातळीवरच मार्गी लावावेत आणि जर तेथे प्रश्न सुटले नाहीत तर महसूल व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण भागातील शेतकरी तसेच गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. या आढावा बैठकीमुळे पांदण रस्ता योजना व घरकुल योजनांच्या कामांना निश्चितच गती मिळेल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.




