आजारी बापासाठी अंधारात शेतात उतरणारा अल्पवयीन मुलगा; संघर्ष का नेहमी फक्त शेतकऱ्याच्याच पदरात येतो?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव शिवारात दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री साधारण ११ वाजता घडलेली एक हृदयद्रावक घटना

आजारी बापासाठी अंधारात शेतात उतरणारा अल्पवयीन मुलगा; संघर्ष का नेहमी फक्त शेतकऱ्याच्याच पदरात येतो?
सिंदखेड राजा पत्रकार गजानन सोनुने
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव शिवारात दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री साधारण ११ वाजता घडलेली एक हृदयद्रावक घटना आज २५ जानेवारी २०२६ रोजी सर्वांसमोर आली असून, ती संपूर्ण शेतकरी वर्गाच्या वेदनेचे वास्तव उघड करणारी आहे.
शेतकरी जनार्धन साहेबराव नागरे हे गंभीर आजारी असून एकाच ठिकाणी अंथरुणाला खिळले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या अल्पवयीन मुलाने चिरंजीव आदित्य जनार्धन नागरे (वय अंदाजे ११ ते १५ वर्षे) यांनी वडिलांच्या जागी जबाबदारी उचलली.
हा मुलगा आज शिक्षण घेण्याच्या वयात आहे; शिकून पुढे जाण्याची स्वप्नं डोळ्यांत असतानाच, शिक्षण करत असतानाही बापासाठी शेतीची जबाबदारी उचलावी लागते, हीच शेतकऱ्याच्या पोराची खरी वेदना आहे.
ई-पीक पेरणीची शेवटची मुदत दिनांक २४ जानेवारी २०२६ होती. त्यामुळे त्याच दिवशी रात्री अकरा वाजता आदित्यने जीव मुठीत धरून शेतात जाऊन गट क्रमांक १२५, १२८ व २१३ मधील गहू व हरभरा पिकांची ई-पीक पेरणी नोंद केली.
आज २५ जानेवारी २०२६ रोजी ई-पीक पेरणीची साईट पूर्णपणे बंद असून मुदतवाढ मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. जर त्या रात्री ही नोंद झाली नसती, तर उद्या निसर्गाने साथ सोडल्यास—अतिवृष्टी, गारपीट किंवा अन्य आपत्ती आली असती—या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून कोणतीही मदत मिळण्याचा मार्गच बंद झाला असता.
मग अशा वेळी या शेतकऱ्याने जायचं तरी कोणाकडे, हा प्रश्न उरतो.
या परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याची माहिती असतानाही, हा अल्पवयीन मुलगा अंधारात, कोणतेही संरक्षण नसताना शेतात उतरतो, हे धाडस नसून व्यवस्थेचे अपयश आहे.
आदित्यने त्या रात्री केलेली ई-पीक नोंद वेदना देणारी नसून,
ती शेतकरी कुटुंबाच्या भविष्यासाठी, उद्याच्या आधारासाठी केलेली शेवटची धडपड आहे.
आज हा प्रश्न एका मुलाचा असला, तरी उद्या तो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांचा प्रश्न ठरू शकतो.
यामुळे आता या परिसरातील शेतकरी ठामपणे मागणी करत आहेत की,
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पेरणीची नोंद राज्य सरकारने स्वतः करावी,
जेणेकरून पुढे कोणत्याही शेतकऱ्याच्या पोराला शिक्षणासोबत शेतीची जबाबदारी अंधारात, भीतीत आणि मजबुरीत उचलावी लागू नये.




